भारतीय नौदलाचा भर समुद्रात थरार
समुद्री चाच्यांच्या ताब्यातील 23 पाकिस्तानी नागरिकांना वाचविले
प्रतिनिधी~ मुंबई
भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांच्या विरोधात मोहीम उघडली असून गेल्या काही दिवसांपूर्वी काही समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर नौदलाने पुन्हा एकदा भर समुद्रात चाच्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. येमेनच्या दक्षिणेला नऊ सशस्त्र चाच्यांनी इराणच्या अल कम्बर 786 या मच्छीमार नौकेचे अपहरण केल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने जोरदार कारवाई करत या जहाजावरील 23 पाक नागरिकांची सुटका केली.
ही घटना सोकोर्टा बेटाच्या दक्षिणेला 90 सागरी मैलावर घडली. नौदलाच्या आयएनएस सुमेधा या युद्धनौकेला 28 मार्च रोजी रात्री अल कंबर 786 या इराणी मच्छीमार नौकेचे समुद्री चाच्यांनी अपहरण केल्याची माहिती समजली. त्यानंतर नौदलाने तातडीने आयएनएस सुमेधा आणि आयएनएस त्रिशूल या विनाशिकेला सोकोर्टा बेटाच्या दक्षिणेला 90 सागरी मैलावर पाठविले. नऊ सशस्त्र चाच्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे वफत्त आल्यानंतर तब्बल 12 तास ही मोहीम सुरू होती.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या नौकेची सुटका करण्याचा प्रयत्न नौदलाकडून सुरू होता. यादरम्यान चाच्यांनी नौदलावर गोळीबार केला. मात्र नौदलाने देखील चांगलेच प्रत्युत्तर देत चाच्यांचा प्रतिकार मोडीत काढला.
गेल्या काही महिन्यांत आदेनच्या खाडीत मालवाहू नौकांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याने भारतीय नौदलाने येथील सतर्कतेमध्ये वाढ केली आहे. 5 जानेवारी रोजी भारतीय नौदलाने लिबरेनचा झेंडा असलेल्या नौकेची सोमालिया सागरी किनाऱ्यावरून सुटका केली होती. समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते. हिंदी महासागरात सुरक्षित आणि निर्धोक प्रवास व्हावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी उपाय करू, अशी ग्वाही नौदल प्रमुख आर. हरिकुमार यांनी 23 मार्च रोजी दिली होती.