न्यूझीलंड-पाक सामन्याने आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीची थरार
आठ संघांचा सहभाग, पाक व दुबईत होणार सामने
वृत्तसंस्था/ दुबई-कराची
कराचीत होणाऱ्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने आज बुधवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवरील पडदा उघडणार आहे. कारस्थान, अनिश्चितता, पडद्यामागील नाट्या हे सर्व या स्पर्धेने सुरुवात होण्यापूर्वीच पाहिलेले असून आता पुढील तीन आठवडे वाढत जाणारी चुरस पाहायला मिळणार आहे.
यात आठ संघ चषकासाठी स्पर्धा करतील. अनेकदा विश्वचषकापेक्षा ही स्पर्धा जिंकणे कठीण असल्याचे म्हटले गेले आहे. भारत दुबईमध्ये लढणार असला, तरी इतर संघ प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये लढतील. पाकिस्तान 1996 च्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. आठ वर्षांनंतर ही स्पर्धा पुनरुज्जीवित करताना अनेक अडथळे पार करावे लागले आहेत. एकीकडे टी-20 क्रिकेटचा उत्साह आणि दुसऱ्या बाजूने पारंपरिक कसोटी यांच्यादरम्यान स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करणारे एकदिवसीय क्रिकेट किती प्रासंगिक राहिले आहे हा बऱ्याच काळापासून वादाचा म्द्दा बनून राहिला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची आवृत्ती जिंकली होती. आजचा उद्घाटनाचा सामना महत्त्वपूर्ण असला, तरी स्पर्धेतील सर्वांत उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा सामना 23 फेब्रुवारी रोजी होईल. त्यात भारत-पाकिस्तान लढत रंगेल. सुरक्षेच्या कारणास्तव भारत पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवण्यास नकार देत असल्याने दुबईमध्ये हा सामना होईल. सांघिक समीकरणांच्या पलीकडे काही खेळाडूंसाठी ही स्पर्धा वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. या यादीत वरच्या क्रमांकावर भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत.
कोहली व रोहित हे आपल्या दीर्घ कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतील निकाल काहीही लागला, तरी ते त्यानंतर भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग असणे कठीण आहे. कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या भविष्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. कारण येथील अपयश निवड समितीला जूनमध्ये होणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्यांच्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडू शकते. त्याचप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात अपयश आल्याह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही अडचणीत येईल. अलीकडच्या मायदेशातील मालिकांत इंग्लंडवर भारताने वर्चस्व गाजविल्याने गंभीरला तात्पुरता दिलासा मिळाला असेल. परंतु न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या भारताच्या अपयशांना मागे ढकलण्यास ते पुरेसे ठरणार नाही.
संघाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने जेतेपद मिळवल्यानंतर भारत 50 षटकांच्या स्वरूपातील त्यांचा पहिला आयसीसी चषक जिंकण्यास उत्सुक असेल. कोहली आणि रोहितसाठी ही एक परिपूर्ण भेट असेल तसेच शुभमन गिलसारख्या काही तऊण नावांसाठी देखील ते प्रेरक ठरेल.
अन्य संघांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया आघाडीचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूडशिवाय खेळणार आहे. परंतु दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाकडे अजूनही चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. कारण त्यांच्याकडे एकदिवसीय स्वरूपाच्या मागण्या पूर्ण करण्यास सक्षम असा फलंदाजी विभाग आहे. इंग्लंड मात्र काही पायऱ्या खाली घसरला आहे. कारण वाढते वय आणि घसरता फॉर्म यांनी त्यांच्या काही आघाडीच्या खेळाडूंना ग्रासले आहे. त्यामुळे जोस बटलर, ज्यो रूट आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारखे खेळाडू तडाखा देऊ शकतील की, हॅरी ब्रूक किंवा बेन डकेटसारखे त्यांचे काही नवीन स्टार नवीन मार्ग उघडतील हे पाहावे लागेल.
ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी यांच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड देखील नवीन मार्गावर प्रवास करत आहे. केन विल्यमसन हे त्यांचे ट्रम्प कार्ड आहे आणि किवींना एकदिवसीय सामन्यांतील पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या दृष्टीने विल्यमसन जोरदार कामगिरी करेल, अशी आशा असेल. दक्षिण आफ्रिकेचेही असेच ध्येय असेल. त्यांनी 1998 मध्ये आयसीसी नॉकआउट्स ट्रॉफी जिंकली होती, परंतु अलीकडच्या काळात त्यांना काहीही जिंकता आलेले नाही आणि टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ यावेळी नशीब पालटण्याची आशा करेल.
पाकिस्तानही एक धोकादायक प्रतिस्पर्धी असून त्यांचा वेगवान मारा अव्वल दर्जाचा आहे आणि त्यांच्याकडे फखर जमान आणि सलमान अली आगासारखे काही फलंदाज आहेत, जे प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्ला चढवू शकतात. अफगाणिस्तानलाही कमी लेखता येणार नसून रशिद खान आणि रहमानुल्ला गुरबाजसारखे खेळाडू असलेला हा संघ कुणालाही प्रचंड दबावाखाली आणू शकतो. तर बांगलादेश 2007 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात जशी आश्चर्यकारक कामगिरी केली होती तशी कामगिरी यावेळी करू शकेल का हे पाहावे लागणार आहे.