Satara Crime : तीन पिस्तुलसह तीन युवक गजाआड
करवडीत दिवाळीतच तीन पिस्तुलांसह तिघे गजाआड
कराड : स्थानिक गुन्हे शाखेने कराड तालुक्यातील करवडी येथे ऐन दिवाळीत कारवाईचा धमाका केला. करबडीत रविवारी रात्री सापळा रचून तीन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन पिस्तुल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. कराडला बेकायदा पिस्तुल तस्करांची साखळी मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सातारा जिल्ह्यात बेकायदा शस्त्र तस्करांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दल अॅक्शन मोडवर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करवडी परिसरात रविवारी रात्री कारमधून तीन युवक येणार असून त्यांच्याकडे तीन पिस्तुल आणि जिवंत काडतुसे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली.
तसेच शामगाव घाट ते कराड शहर या मार्गावरून पांढऱ्या ब्रिझा कारमधून काही इसम विनापरवाना पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री सापळा रचला.
वर्णनावरून कार ओळखली अन् अडवली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करवडी हद्दीतील दर्शन रसवंतीगृहासमोर दबा धरला. प्रत्येक वाहनांवर पोलिसांची बारकाईने नजर होती. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पांढरी ब्रिझा कार दिसताच पोलिसांनी रस्त्यावर साखळी करत ही कार थांबवली. कारमधील संशयितांना बाहेर घेत पोलिसांनी वेळ न घालवता त्यांची झडती घेतली. अक्षय प्रकाश सहजराव (वय २८, रा. लाहोटी नगर, मलकापूर, कराड), कार्तिक अनिल चंदवानी (वय १९ रा. लाहोटीनगर, मलकापूर, कराड), ऋतेष धर्मेद्र माने (वय २२, रा. कृष्णांगण, वाकाण रोड, कराड) यांच्याकडे तीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी कारसह त्यांना ताब्यात घेतले. या तीनही युवकांना कराड तालुका पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केली.
पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कार्तिक चंदवानी याच्याकडे असलेल्या पिशवीतून तीन देशी बनावटीची पिस्तूल, ऋतेष माने याच्या पॅन्टच्या खिशात तीन जिवंत काडतुसे, तसेच अक्षय सहजराव याच्या ताब्यात ब्रिझा कार आढळली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, उपनिरीक्षक परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, कराड तालुका पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार
आतिष घाडगे, हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, शिवाजी गुरव, कराड तालुका पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार संदीप कांबळे, मिलिंद बैले, विकास शेडगे, योगेश गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.