चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू
पंढरपूर :
पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत शनिवारी सकाळी स्नानासाठी उतरलेल्या तीन महिला भाविकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40), दोघीही रा. भोकरदन, जि. जालना यांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या अनोळखी महिलेचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही, आणि तिचा शोध सुरू आहे.
सध्या उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा आरोप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

शनिवारी सकाळी विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तिन्ही महिला पुंडलिक मंदिराशेजारील नदीपात्रात स्नानासाठी उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यांच्या सोबतच्या इतर महिलांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक दिली, पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की काही क्षणांतच तिन्ही महिला वाहून गेल्या.
पोलिस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तिसऱ्या महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या हलगर्जीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रभागेची पाणीपातळी वाढलेली असताना तिथे सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक, प्रतिबंधक जाळ्या किंवा जीवनरक्षक यंत्रणा उपलब्ध नसणे हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे.