दु:खाचे तीन प्रकार
अध्याय अकरावा
सत्व, रज, तम या तीन गुणांनी माणसाचा स्वभाव तयार होतो. सुरवातीला म्हणजे बालवयात माणसाच्या स्वभावात या त्रिगुणांची साम्यावस्था असते. पुढे तो जसजसा मोठा होत जातो तसतसा पूर्वकर्मानुसार त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना अनुकूल असा त्याचा स्वभाव विकसित होतो. त्याला लाभलेली कौटुंबिक पार्श्वभूमीही स्वभावाला पोषकच असते.
थोडक्यात आयुष्यात कोणत्या घटना घडाव्यात हे जसे माणसाच्या हातात नसते त्याप्रमाणे स्वभाव कसा असावा हेही मनुष्य ठरवू शकत नाही. परंतु तो जर शास्त्रवाचन करेल, संत सांगतील त्याप्रमाणे राहील, संत साहित्याचा अभ्यास करेल तर त्याला स्वत:च्या स्वभावाची ओळख होईल. तो जर सात्विक असेल तर, तो त्याच्या सात्विकतेत भर पडेल असे वागत राहील पण जर तो राजस किंवा तामसी असेल तर त्यामध्ये बदल करून तो सात्विक व्हावा म्हणून प्रयत्न सुरू करेल. ज्याला अशी इच्छा होईल त्याचा स्वभाव हळूहळू बदलत बदलत सात्विक होत जाईल. अर्थात ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून माणसाने निराश न होता चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवावेत. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणे हा सर्वोच्च योग आहे असे बाप्पा आवर्जून सांगतात आणि तो साधण्यासाठी माणसाचे आचारविचार पूर्णतया सात्विक असणं महत्त्वाचं आहे.
ते तसे व्हावेत या एकाच उद्देशाने बाप्पा मागील काही श्लोकातून सात्विक, राजस आणि तामस कर्मे, कर्ता, सुखदु:खे आदींवर सविस्तर बोलत आहेत. जेणेकरून माणसाने आपले वागणेबोलणे वारंवार तपासत रहावं. एखाद्या वेळी चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा व पुढील वेळी तशीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून दक्ष राहावं. चूक दुरुस्त करण्याची संधी माणसाला मिळत असते. कारण त्याच्या आयुष्यात तीच तीच माणसे पुन:पुन्हा येत असतात व तेच तेच प्रसंग वारंवार घडत असतात. आधीच्या प्रसंगात झालेली चूक बाप्पांच्या उपदेशाच्या अभ्यासातून लक्षात आली की, तो पुन्हा तशीच चूक करणार नाही अशी बाप्पांची अपेक्षा आहे.
निस्वार्थपणा हा सात्विक कर्त्याचा मुख्य गुण असल्याने तो करत असलेले प्रत्येक कर्म हे समाजाच्या भल्यासाठीच असते. तो सतत उत्साही असतो. राजस कर्त्याला सतत निरनिराळ्या इच्छा होत असतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी तो राबत राहतो. त्याच्यावर सुखदु:खाचा सतत मारा होत असल्याने तो शेवटी हतबल व निराश होतो. तामस कर्ता कामचुकार असतो. सुखं आणि दु:खही तीन प्रकारची असतात असं बाप्पा ज्या श्लोकातून सांगत आहेत तो ‘सुखं च त्रिविधं राजन्दु:खं च क्रमतऽ शृणु । सात्त्विकं राजसं चैव तामसं च मयोच्यते ।। 21 ।।हा श्लोक आपण सध्या अभ्यासत आहोत. दु:खाचे तीन प्रकार ह्याप्रमाणे,
सात्विक दु:ख : कोणतेही धर्मकार्य करताना सुरवातीला शारीरिक श्रम करावे लागतात, पहाटे उठावे लागते, पैसा खर्च करावा लागतो. सुरवातीला या गोष्टी दु:खदायक वाटतात पण नंतर केलेल्या धर्मकार्यांच्या फळाच्या स्वरूपात सुख मिळणार असते. राजस दु:ख : विषयोपभोग मिळण्यासाठी जी साधना केली जाते ती करताना साधना करण्यात जे दु:ख भोगावे लागते त्याला राजस दु:ख असे म्हणतात. राजस दु:ख भोगल्यावर काही काळ मनुष्य भोगविलासात रमून तात्पुरता सुखी होतो परंतु राजस सुखं देणाऱ्या व्यक्ती, वस्तू वा परिस्थिती या कायम टिकणाऱ्या नसल्याने अंतिमत: मनुष्य दु:खी होतो.
तामस दु:ख : तमोगुणवर्धक दारू इत्यादि मिळवण्यासाठी जे दु:ख सोसावे लागते ते तामस दु:ख होय. तामस दु:ख सहन केल्यावर मनुष्य काही काळ नशेत बुडून जातो व त्यातून आनंद मिळतो असे त्याला वाटते पण अशाप्रकारे नशापाणी करून मनुष्य स्वत:च्या शरीराची हानी करून घेतो. नशेत असल्याने अविचारी कृत्ये करून इतरांना शारीरिक, मानसिक त्रास देतो.
क्रमश: