For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवकाळी पावसाने स्मार्ट सिटीचे ‘तीन तेरा’

09:05 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अवकाळी पावसाने स्मार्ट सिटीचे ‘तीन तेरा’
Advertisement

जोरदार पावसामुळे राजधानीची दुर्दशा , - मांडवी पुलावरही तुंबले पाणी

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

सकाळच्या वेळेत राजधानीत कामासाठी येणाऱ्यांची रस्त्यांवर झालेली गर्दी आणि अशातच सकाळी दहा वाजता जोरदार अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने पहिल्याच पावसात पणजीची दैनावस्था झाली. सकाळी दहा वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी बारापर्यंत जोरदार कोसळला. या पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीच्या कामाचा परिणाम जाणवला आणि राजधानी पणजीचे ‘तीन तेरा’ वाजले. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी केला असून अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांवर पावसाचे ढग घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

पणजीत सकाळी जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर पणजी शहरात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम शहरातील मुख्य बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दिवजा सर्कल परिसर शहरातील मुख्य ‘18 जून रस्ता’, मार्केट परिसर, मिरामार, बालभवन आदी परिसरात पाणी तुंबून राहिले. सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला. जोरदार पावसामुळे बाजारहाट व कामासाठी पणजीत आलेले नागरिक आसरा शोधताना दिसले. परंतु पावसाच्या सरी जोरदार कोसळू लागल्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

अवकाळी पावसामुळे पणजी मार्केट परिसर, इतर ठिकाणी किरकोळ झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तसेच चार चाकी वाहन चिखलात ऊतले. पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असल्याने शहरात मातीचे ढिगारे आहेत. रस्ते उखडलेले आहेत. मान्सूनपूर्व कामेही अर्धवट स्थितीत आहेत. त्यातच अचानक झालेल्या पावसामुळे पालिका प्रशासन हतबल झाले होते. पालिका कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्याला मोकळी वाट करून देण्याचा खटाटोप चालवला. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

शहरात बाजारहाट व कामासाठी आलेले दुचाकीस्वार अनेक ठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडले. बहुतांश रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे गुडघाभर पाण्यातून दुचाकीचालक व पादचारी वाट काढत होते. अंगावर रेनकोट नसल्याने अनेकांना आडोसा घ्यावा लागला. पावसामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसली तरी जनजीवनावर काही काळ परिणाम झाला. दुपारी बारानंतर पाऊस कमी झाला. पणजी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जनजीवन पूर्वपदावर आले.

  तुंबले पाणी, दुकानदारांना फटका

कोसळलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पणजी शहर जलमय झाले. अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे दुकानांत पाणी शिरले. त्यापैकी डॉ. आंबेडकर उद्यानासमोरील काही दुकाने, 18 जून रस्त्याच्या बाजूकडील दुकाने, पणजी बसस्थानक परिसर, दयानंद बांदोडकर रस्ता, ‘बॉम्बे बाझार’ परिसर, बालभवन परिसर, मिरामार सर्कल परिसर, भाटले, टोंक, सांतईनेज परिसर, सांताक्रुझ आदी ठिकाणी पाणी तुंबले तर काही ठिकाणच्या दुकानदारांना याचा फटका बसला.

पावणेचार इंच पावसाची नोंद

स्मार्ट सिटी पणजीत आज सकाळी 10 ते दुपारी 12 या दोन तासांत तब्बल 3.69 इंच अवकाळी पाऊस पडल्याची नोंद झाली. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर 10 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी 12 नंतर पावसाचा जोर कमी झाला. पणजी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

महापौरांकडून पाहणी; सोमवारी विशेष बैठक

अवकाळी पावसाचा शहराला बसलेल्या फटक्यामुळे महापौर रोहित मोन्सेरात यांनी 18 जून रस्ता व इतर ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी पाणी तुंबले त्या ठिकाणचे पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्याची सूचना पालिका कर्मचाऱ्यांना केली. शहरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मोन्सेरात यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही पाहणी केली. शहरातील बहुतांश गटारांतील कचरा काढण्यात आला आहे. परंतु अवघ्याच काही ठिकाणी मान्सूनपूर्व कामे शिल्लक आहेत. तरीही स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरात पाणी साचत असल्यामुळे येत्या सोमवारी मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत विशेष बैठक बोलावली आहे.

राज्यात खंडित वीजपुरवठा, किरकोळ पडझड

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. काल शनिवारी सकाळी फोंडा, मडगाव, काणकोण, साखळी, बेती, बिठ्ठोण, पर्वरी आदी ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. राज्यातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता. सांखळीत सध्या चैत्रपौर्णिमा उत्सव सुरू असल्याने या पावसाचा परिणाम जाणवला. या ठिकाणच्या दुकानदारांची पावसामुळे तारांबळ उडाली. राज्यातील अनेक ठिकाणी किरकोळ पडझडी झाल्या.

Advertisement
Tags :

.