For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार भाजपच!

12:01 PM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार भाजपच
Advertisement

डॉ. प्रमोद सावंत यांचा ठाम विश्वास : उत्तर-दक्षिणेतील मताधिक्क्याचा पुनऊच्चार,गोमंतकीय मतदारांचे मानले आभार

Advertisement

पणजी : राजकीय समिकरणे काहीही असली, अंदाज आखाडे, दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप कितीही असले तरी विजय भाजपचाच होणार आहे. मोठ्या मताधिक्क्याने दोन्ही जागा आम्हीच जिंकणार आहोत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मतमोजणी होण्यापूर्वीच काँग्रेसने हार मानली आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल बुधवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचीही उपस्थिती होती.

मतदारांचे मानले आभार

Advertisement

सर्वप्रथम तिन्ही नेत्यांनी, गोमंतकीय जनतेने विक्रमी संख्येने बाहेर पडून मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. मतदानाच्या दिवशी मंगळवारी राज्यात प्रचंड उकाडा होता. जीवाची काहिली होत होती. तरीही लोक मोठ्या उत्साहात घराबाहेर पडले. त्यात प्रथमच मतदान करणाऱ्या तऊणांबरोबरच शंभरी पार केलेल्या अनेक ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिकांचा समावेश होता. त्याशिवाय दिव्यांग, आजारी, अपघातातील जखमी यांचाही भरणा होता. त्यामुळेच राज्यात पाऊणशे टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मतदान बनले महोत्सव

निवडणूक यंत्रणेने चांगली जनजागृती केल्यामुळे मतदान हा एक महोत्सव बनला होता. काही केंद्रांवर करण्यात आलेली सजावट, शीतपेय यासारखी व्यवस्था पाहता मतदारांना आपण एखाद्या विवाह सोहळ्यास आल्याचाच भास होत होता, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली. हा उत्साह पाहता राज्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार असून आम्ही दावा केलेले उत्तरेत एका लाखापेक्षा जास्त, आणि दक्षिणेत 60 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्य नक्की मिळेल, याचा पुनऊच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. खास करून दक्षिण गोव्यातील फोंडा, मडकई, शिरोडा, सावर्डे, सांगे आणि काणकोणमध्ये भाजपला मोठे मताधिक्क्य मिळेल. दक्षिणेत केवळ 6 मतदारसंघात टक्केवारी घटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस राहिलाय केवळ चार मतदारसंघांपुरता

भाजप नेहमीच विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढतो तर काँग्रेसने नेहमीच जात आणि धर्माच्या आधारे राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे मुद्देच नसतात, कारण यापूर्वी दुहेरी इंजिन सरकार असुनसुद्धा त्यांनी गोव्यासाठी काहीच केलेले नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचाही अभाव होता. परिणामी मतदान केंद्रांच्या बाहेर टेबल मांडून बसण्यासाठीही त्यांच्याकडे माणसे नव्हती, एवढी दयनीय स्थिती या पक्षाची झालेली आहे. सध्या हा पक्ष केवळ चार मतदारसंघांपुरताच मर्यादित राहिला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. गोमंतकीय आता पूर्वीसारखे अशिक्षित अडाणी राहिलेले नाहीत. ते आता सजग, सुशिक्षित आणि शहाणे बनले आहेत. त्यामुळे राज्यात आता जात धर्माच्या आधारे  मतदान होत नाही. भविष्यातही या धर्तीवर मतदान होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement
Tags :

.