For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत वाजले क्रिकेटचे तीन तेरा!

06:22 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत वाजले क्रिकेटचे तीन तेरा
Advertisement

संपलं एकदा अमेरिकेतील क्रिकेट. ज्या क्रिकेटबद्दल अमेरिकेत बरंच कुतूहल होतं ते क्रिकेट एकदाच संपलं. ऑस्ट्रेलियातून आयात केलेली खेळपट्टी, झटपट बनवलेली आसनव्यवस्था यांना एकदाचा पूर्णविराम मिळाला. क्रिकेटमधील विश्वचषकासारख्या एका मोठ्या फॉरमॅटमधून अमेरिकेने काय साध्य केले हा मात्र कळीचा मुद्दा आहे. ड्रॉपइन पिचबद्दल बरीच मतमतांतरं झालीत. यातून खरंच क्रिकेट अमेरिकेत बहरणार आहे का? फुलणार आहे का? असा जर प्रश्न तुम्ही मला विचाराल तर त्याचे उत्तर शंभर टक्के नाही आहे. आयसीसी कुठल्याही मोठ्या स्पर्धेची घोषणा करण्याआधी दोन ते तीन वर्षे अगोदर त्या देशाला  यजमानपद बहाल करते. अमेरिकेतील स्पर्धा निश्चितच महिनाभर अगोदर जाहीर झाली नव्हती. अमेरिकेला जर खरोखरच एक चांगलं क्रिकेट जगाला दाखवायचं होतं तर त्यांनी नैसर्गिक खेळपट्ट्या बनवल्या पाहिजे होत्या. परंतु तसं मात्र काही घडलं नाही. ड्रॉपिंग पिचमुळे क्रिकेटमध्ये आम्ही एक नवीन क्रांती घडवू पाहतोय हा जो भ्रम होता त्या भ्रमाचा भोपळा पुरता फुटलाय. नशीब क्रिकेटपटूंचं की या खेळपट्टीवर कुठला खेळाडू जायबंदी झाला नाही. दुर्दैवाने जर अशी घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? आणि तीही विश्वचषकासारख्या मोठ्या फॉरमॅटमध्ये. याचा सखोल अभ्यास हा आयसीसीला करावाच लागेल.

Advertisement

क्रिकेटला चालना मिळावी म्हणून आयसीसीने अमेरिकेला व वेस्टइंडीजला यजमानपद बहाल केलं. वेस्टइंडीज अनऑर्गनाईज्ड देश आहे तर दुसरीकडे अमेरिका ऑर्गनाइज्ड आहे. परंतु त्यांचं क्रिकेट बोर्ड हे अनऑर्गनाईज्ड आहे. शेकडो कोटी खर्च करून टी-20 सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये फक्त 100 ते 110 धावा बघण्यासाठी वेगवेगळ्या देशातील हजारो क्रिकेटप्रेमीनी अमेरिकेत का जावं, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. अमेरिकेचा पहिला सामना सोडला तर बाकीचे सर्व सामने छोटेखानी धावसंख्येचेच झालेत. गंमत बघा, काही दिवसांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये नागपुरात भारत विऊद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामना झाला होता. तो सामना पावसामुळे कमी षटकांचा खेळवण्यात आला होता. खराब आऊटफिल्डमुळे तो सामना बराच चर्चेत राहिला होता. त्यानंतर आयसीसीने बीसीसीआयला खडे बोल सुनावले होते. एका द्विपक्षीय मालिकेत जर आयसीसी आक्रमकपणा घेत असेल तर विश्वचषकासारख्या मोठ्या फॉरमॅटमध्ये ज्यांना क्रिकेटचा अनुभव नाही अशा अमेरिकेत क्रिकेटमध्ये आयसीसीने गांभीर्य का दाखवलं नाही किंबहुना नियोजनात ढिसाळता का दाखवली, याचे उत्तर आयसीसी देणार आहे का?

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी क्रिकेटने निराश केल्यानंतर अमेरिकेतील दुसऱ्या मैदानाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु इथे पावसाचा पॉवरप्ले बघायला मिळाला. 4 पैकी 3 सामने अक्षरश: वाहून गेले. भारत-कॅनडा, आयर्लंड-अमेरिका, नेपाळ -श्रीलंका हे सामने वऊणराजाच्या अवकृपेमुळे रद्द झालेत. परंतु या वाहून गेलेल्या सामन्यामुळे दोन्ही संघाना एक-एक गुण मिळाला खरा. परंतु याच सामन्यांमुळे टी-20 विश्वचषकाची पूर्ण समीकरणं बदलली. फक्त गलगठ्ठा पैसा असून काही होत नाही तर त्यासाठी व्यवस्थापन नीटनेटके असणे गरजेचे असते, हे अमेरिकेला कालांतराने समजेल यात काही शंका नाही. परंतु या क्रिकेटमधील नियोजनाच्या अपयशाचा वाटेकरी कोण? अमेरिका की आयसीसी, याचे उत्तर मात्र अनुत्तरीत राहणार आहे. आजकाल अति क्रिकेटमुळे काही मंडळी क्रिकेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत. अशा घटनांमुळे क्रिकेटरसिक देखल्या देवा दंडवत करतील हेही तेवढेच खरे. जाता जाता यजमान अमेरिकेने आपलं सुपरएटचे स्थान पक्कं करीत 2026 टी-20 विश्वचषकातील सहभागाचे तिकीट कन्फर्म केलं.  हीच काय ती कमाई अमेरिकेने या विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून केली एवढे मात्र खरं.

Advertisement

Advertisement
Tags :

.