भारत - दक्षिण आफ्रिका अंतिम मुकाबला आज
भारत आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास सज्ज, विराट कोहलेकडून चमकदार कामगिरीने समाप्तीची अपेक्षा
प्रतिनिधी/ ब्रिजटाउन (बार्बाडोस)
आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाच्या बाबतीत आपला प्रदीर्घ दुष्काळ संपवण्यास आसुसलेला बलाढ्या भारतीय संघ आज शनिवारी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा मुकाबला करणार असून यावेळी भावनांवर पकड महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेतील भारताची मोहीम गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसारखीच राहिली आहे. तिथेही त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि ऑस्ट्रेलियासमोर त्यांना नमते घ्यावे लागले होते.
भारतीय संघ या स्पर्धेतही अपराजित राहिलेला आहे आणि आतापर्यंत स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यावेळी त्यांच्या ट्रॉफीच्या मार्गात ऑस्ट्रेलिया नाही. दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी स्पर्धेत एकमेव विजय 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत नेंदला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात ‘चोकर्स’ असे लेबल लागलेला दक्षिण आफ्रिकी संघ आज केन्सिंग्टन ओव्हलवर हा शिक्का पुसून टाकण्याच्या निर्धाराने उतरेल.
गयाना येथे उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर मात केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याच्या संघाची मजबूत दावेदार म्हणून परिस्थिती आणखी भक्कम झाली आहे. भारताला आज जेतेपद मिळाल्यास मावळते प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी देखील हा एक परिपूर्ण निरोप ठरेल. कॅरिबियन भूमीत 2007 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात संघाला लवकर बाहेर पडावे लागल्यानंतर तत्कालीन कर्णधार द्रविडवर भरपूर टीका झाली होती.
संघ व्यवस्थापनाच्या या स्पर्धेसाठी योजना स्पष्ट राहिलेल्या आहेत. ट्रम्प कार्ड कुलदीप यादवला कॅरिबियनमधील फिरकीस अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळायला आणण्यापूर्वी त्यांनी न्यूयॉर्कमधील खेळपट्ट्यांवर तीन वेगवान गोलंदाजांचा वापर केला. भारताच्या संघरचनेत बदल होण्याची शक्यता नाही. परंतु दोन प्रमुख खेळाडू या महत्त्वाच्या क्षणी हवी तशी कामगिरी करतील अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाला असेल. त्यात सुपरस्टार विराट कोहलीला या स्पर्धेत चमक दाखविता आलेली नाही. आयपीएलच्या शानदार हंगामानंतर हे अपेक्षित नव्हते.
याउलट रोहितने आपल्या कामगिरीने संघातील इतर फलंदाजांना मार्ग दाखवला असून अंतिम फेरीत त्याची खेळी खूप महत्त्वाची ठरेल. कर्णधार रोहितची शिवम दुबेने उत्कृष्ट कामगिरी करावी, अशीही अपेक्षा असेल. त्याने आतापर्यंत स्पर्धेत फारशी चमक दाखविलेली नाही. केशव महाराज आणि तबरेझ शम्सी या फिरकीपटूंविऊद्ध तो मोठा प्रभाव पाडू शकतो. गोलंदाजीच्या आघाडीवर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या दोघांनीही आपली भूमिका चोख बजावलेली असल्याने भारताला काळजी करण्याची काहीच गरज नाही.
इंग्लंडविऊद्धच्या उपांत्य फेरीनंतर येथे पोहोचलेल्या भारतीय संघाला ताजेतवाने होण्यासाठी फक्त एक दिवस मिळालेला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला अतिरिक्त दिवस मिळालेला आहे. भारतासारखी त्यांची स्थिती नसून त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही कारण ते यापूर्वी कधीही विश्वचषक फायनलमध्ये झळकलेले नाहीत. परंतु त्रिनिदादमध्ये अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांची जेतेपदाची भूक जागृत झाली आहे.
त्यांना क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स या सलामीच्या जोडीकडून आज धावांची अपेक्षा असेल, विशेषत: डी कॉक प्रतिस्पर्धी संघावर गंभीर दबाव आणू शकतो. कर्णधार एडन मार्करम सुपर एटमध्ये मोठ्या संघांविऊद्ध हल्या करू शकलेला नाही आणि तो आज ही कसर भरून काढण्यास उत्सुक असेल.
विध्वंसक हिटर्सपैकी एक असलेल्या हेनरिक क्लासेनलाही धावांची गरज आहे आणि त्यासाठी त्याला मधल्या षटकांमध्ये फिरकीच्या धोक्याचा सामना करावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान मारा परिणामकारक असला, तरी दिवसा होणाऱ्या सामन्यात त्याचा काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. शम्सी आणि महाराज प्रभावी आहेत, पण भारतीय फलंदाजांना त्यांची धास्ती राहणार नाही. आज शनिवारी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता जास्त आहे. पण आयसीसीने या महत्वाच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, फॉर्च्युइन, रायन रिकेल्टन.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.