तिघाजणांच्या आत्महत्येप्रकरणी तीन संशयितांना अटक
रोख रक्कम, 661 ग्रॅम सोनेही जप्त : आणखी काहींच्या अटकेची शक्यता
बेळगाव : एकाच कुटुंबातील तिघाजणांच्या आत्महत्येप्रकरणी शहापूर पोलिसांनी तिघाजणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काहीजणांचा सहभाग असून त्यांनाही लवकरच अटक करू, असे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले. केशवनगर-वडगाव येथील एका घरावर छापा टाकून 7 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम व 661 ग्रॅम सोने असा एकूण 56 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. राजेश अच्युत कुडतरकर (वय 52) रा. केशवनगर-वडगाव, भास्कर ऊर्फ कृष्णा नारायण सोनार (वय 47), राहणार टीचर्स कॉलनी, दुसरा क्रॉस खासबाग, नानासो हणमंत शिंदे, (वय 35) राहणार बिच्चू गल्ली, शहापूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत.
सोन्याच्या भिशीतील नुकसानीमुळे जोशी मळा, खासबाग येथील संतोष गणपती कुर्डेकर (वय 47), त्याची बहीण सुवर्णा गणपती कुर्डेकर (वय 52), आई मंगल गणपती कुर्डेकर (वय 80) या तिघा जणांनी बुधवार दि. 9 जुलै रोजी सकाळी पोटॅश रसायन पिऊन आत्महत्या केली होती. संतोषची आणखी एक बहीण सुनंदा गणपती कुर्डेकर (वय 50) ही या दुर्घटनेतून बचावली आहे.सुनंदा कुर्डेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश कुडतरकर व त्याची पत्नी रिना या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले होते. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी आदी अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष केशवनगर-वडगाव येथील राजेश कुडतरकर याच्या घरात शोधमोहीम राबविली आहे. यावेळी एकूण 56 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, श्रीमती एस. एन. बसवा, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. ए. चौगला, हवालदार नागराज ओसप्पगोळ, एस. एम. गुडदयगोळ, संदीप बागडी, श्रीशैल गोकावी, श्रीधर तळवार, अजित शिप्पुरे, आर. राजश्री आदींनीही भाग घेतला आहे. आत्महत्या केलेल्या संतोषच्या खिशात आढळून आलेल्या मृत्युपत्रात राजेश कुडतरकर याच्याबरोबरचे व्यवहार व सोन्याच्या भिशीत झालेले नुकसान याचा उल्लेख होता. त्यामुळेच पोलिसांनी राजेशच्या घरावर छापा टाकला आहे. त्याची पत्नी रिनाचीही चौकशी करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
बेकायदा भिशी-खासगी सावकारांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याची सूचना
आत्महत्या केलेल्या संतोष कुर्डेकरने लिहिलेले मृत्युपत्र जप्त केले आहे. त्याच्या मोबाईलमध्येही काही व्यवहार व काही जणांच्या नावांचा उल्लेख आला आहे. यावरून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. कर्जदारांना कोणी इतका त्रास देऊ नये, असा उल्लेख दुर्दैवी संतोषने केला आहे. त्यामुळे सोन्याच्या भिशीत झालेले नुकसान त्यानंतर केलेला छळ व दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सामोरे आले आहे. या प्रकरणानंतर बेकायदा भिशी व खासगी सावकारांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. गरजेला पैसे उचलल्यानंतर मनमानी वसुली केली जाते. नागरिकांनीही आपल्या अडचणीला बेकायदा सावकारी करणाऱ्यांकडे कर्ज उचलू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.