कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धुरामुळे श्वास गुदमरून तिघा मावस भावांचा मृत्यू

10:57 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमननगर सफा कॉलनीतील हृदयद्रावक घटना : नामकरण सोहळ्यानिमित्त आले होते आजोळी : आणखी एक तऊण अत्यवस्थ

Advertisement

बेळगाव : बेडरूममध्ये शेकोटीसाठी कढईत कोळसे पेटवल्याने धूर केंडला अन् त्यात श्वास गुदमरून तिघा मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अमननगर येथील सफा कॉलनीत मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी 4.30 वाजता उघडकीस आली. यामध्ये अन्य एक तरुण अत्यवस्थ असून त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहीद अब्दुल नालबंद (वय 25, रा. तिसरा क्रॉस अमननग), रेहान रसुल मत्तेs (वय 22, रा. वडगाव), सर्फराज मुस्ताक हरपनहळ्ळी (वय 18, रा. सफा कॉलनी, अमननगर)अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर शहनवाज मुस्ताक हरपनहळ्ळी (वय 20, रा. अमननगर) याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अब्दुल्ला मोहम्मदगौस नालबंद (वय 60) रा. अमननगर यांनी  माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली आहे.

Advertisement

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अब्दुल्लाची मोठी मुलगी मदिया फराज सिदनाळी हिचा विवाह भारतनगर (बॉक्साईट रोड) येथील फयाज सिदनाळी याच्याशी करून दिला असून मुलगी मदिया हिची दीड महिन्यापूर्वी प्रसूती झाली असून तिला दुसरा मुलगा झाला आहे. तिच्या मुलाचा नामकरण सोहळा सोमवार दि. 17 रोजी रात्री 9 च्या दरम्यान फिर्यादीच्या घरात म्हणजेच आजोळला आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला फिर्यादीच्या पत्नीच्या बहिणी व त्यांची मुले, नातेवाईक आले होते. कार्यक्रम रात्री 1 च्या दरम्यान संपला. फिर्यादीची मेव्हणी रेश्मा हिने आपल्या पतीला बोलावून घेतले व आपल्या मुलाला फिर्यादीच्या घरी सोडून ती आपल्या घरी वडगावला निघून गेली. दुसरी मेव्हणी फरिदा आणि तिची मुले फिर्यादीच्या घरात राहिली. नंतर सर्फराज, शहानवाज आणि मोहीद यांना मेव्हणीचा मुलगा रेहान हा आपल्या घरी झोपण्यासाठी घेऊन गेला.

 तिघेजण झोपी गेलेल्या ठिकाणीच मृत्यूमुखी

मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास फिर्यादीची पत्नी बेबीबतुल आणि मेव्हणी फरिदा लेकव्ह्यू हॉस्पिटलला कामासाठी गेल्या. तर फरिदाचा मुलगा फिर्यादीच्या घरात होता. अब्दुलादेखील सकाळी कामावर गेले. सायंकाळी 4.30 च्या दरम्यान मेव्हणा फयाज याने फोन करून सर्फराज, शहानवाज, मोहीद आणि रेहान हे चौघेजण सफा कॉलनीतील सर्फराज यांच्या घरी झोपी गेले होते. मात्र, त्यांचा श्वासोच्छवास सुरू नाही. तुम्ही लवकर या, असे सांगितल्याने फिर्यादीने सर्फराजच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. बेडरूममध्ये अब्दुला यांचा मुलगा मोहीद, रेहान मत्ते आणि सर्फराज हरपनहळ्ळी हे तिघेजण झोपी गेलेल्या ठिकाणीच मयत झाले होते. या चौघांना नातेवाईकांनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बेडरूममध्ये कढईत कोळसे पेटवल्याने धुर केंडला

सोमवारी रात्री 1 च्या दरम्यान अब्दुला यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आटोपून चौघेजण मेव्हणीच्या सफा कॉलनी येथील घरात झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी रात्री थंडीचा कडाका अधिक होता. त्यामुळे शेक घेण्यासाठी चौघा मावस भावांनी बेडरूममध्ये एका कढईत कोळसे पेटवून त्याचा शेक घेतला व मुख्य दरवाजाला आतून कडी लावून सर्वजण झोपी गेले. ज्या घरामध्ये ते झोपी गेले होते त्या घरात खिडकी किंवा एक्झॉस्ट नाही. तसेच हॉलमधील खिडकीही त्यांनी बंद केली होती.  सर्वजण झोपी गेल्यानंतर बेडरूममध्ये कोंडलेल्या धुरामुळे श्वास गुदमरून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर शहानवाज याचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस उपनिरीक्षक व्हनाप्पा तलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा केला. तिघा मावस भावांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याने पालक, तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. याप्रकरणी रात्री माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागृहात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळी आमदार असिफ सेठ यांची भेट

अमननगर येथील सफा कॉलनीत एका घरात झोपी गेलेल्या तिघा मावस भावांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. ही माहिती समजताच आमदार आसिफ सेठ व त्यांचा मुलगा अमन सेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त करीत नातेवाईकांना धीर दिला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article