तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल
शास्त्रात नवे नियम सुस्थापित करण्याचे केले काम
वृत्तसंस्था / स्टॉकहोम
भौतिक शास्त्राप्रमाणे रसायन शास्त्राचेही 2025 चे नोबेल महापारितोषक 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले आहे. नोबेल पुरस्कार समितीने बुधवारी ही घोषणा केली. सुसुमू किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमार याघी अशी या मानकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी धातू-सेंद्रीय फ्रेमवर्कच्या माध्यमातून नव्या रेणूंची निर्मिती केली आहे. तसेच आजवरच्या काही नियमांना पार करुन नवे नियम सुस्थापित केले आहेत. त्यामुळे त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे, असे नोबेल पुरस्कार समितीने तिच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
सुसुमू किटागावा हे जपानचे असून ते क्योटो विद्यापीठाचे संशोधक आहेत. रिचर्ड रॉबसन हे ऑस्टेलियाचे असून ते मेलबोर्न विद्यापीठाचे संशोधक आहेत. तर ओमार याधी हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधक आहेत. या तिघांचे आधुनिक रसायनशास्त्रात मोटे योगदान असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
नवे मॉलेक्युलर आर्किटेक्चर
या तीन संशोधकांनी धातू आणि सेंद्रीय रेणू यांच्या संयोगातून नवे मॉलेक्युलर आर्किटेक्चर निर्माण केले आहे. या पद्धतीत विशिष्ट धातूंचे अणू सेंद्रीय कार्बन रेणूंच्या लांब साखळ्यांशी जोडले गेलेले आहेत. ही नवी रचना आहे. या रचनेतून नवे अधिक उपयुक्त रेणू निर्माण करणे शक्य होणार आहे. या रचनांचा विविध स्थानी उपयोग करता येण्यासारखा आहे. धातूंचे आयॉन्स आणि सेंद्रीय रेणू यांच्या संयोगातून नवे स्फटिक निर्माण करण्यात आले आहेत. हे नव्या पद्धतीचे बिल्डिंग ब्लॉक्स रसायन शास्त्राचे स्वरुप पालटणारे आहेत, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
1989 पासून प्रयत्न
धातूंचे धनभारित आयॉन्स आणि सेंद्रीय रेणू यांचा संयोग करुन नवे रासायनिक पदार्थ निर्माण करण्याचा प्रयत्न रॉबसन यांनी प्रथम 1989 पासून करण्यात प्रारंभ केला आहे. त्यानंतर अन्य काही शास्त्रज्ञांनी या प्रयत्नांमध्ये अधिक भर टाकण्याचे काम केले. 2005 पासून या प्रयत्नांना यश येऊ लागले. त्यानंतर 2015 मध्ये अशा प्रकारचे बिल्डिंग ब्लॉक्स निर्माण करण्यात यश आले. आता ही प्रक्रिया रसायनशास्त्रात सुस्थापित झाली आहे. या तीन शास्त्रज्ञांचा ही प्रक्रिया विकसीत करण्यात मोठा सहभाग आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानामुळे रसायनशास्त्राच्या नव्या नियमांचा विकास झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रारंभीच्या काळात अपयश
धातू आणि सेंद्रीय रेणू यांचा संयोग घडवून आणण्याच्या कार्यात रॉबसन यांना प्रथम काही प्रमाणात अपयश आले होते. त्यांनी अशा प्रकारच्या रचना निर्माण केल्या. पण त्या अस्थिर होत्या. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग अन्यत्र होण्यासारखा नव्हता. तथापि, नंतर स्थिर बिल्डिंग ब्लॉक्स बनविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. परिणामी, ही प्रक्रिया रसायनशास्त्रात सुस्थापित झाली आहे.
आज अर्थशास्त्राचे नोबेल ?
विज्ञानाच्या तीन्ही शाखांमधील नोबेल पुरस्कारांची घोषणा आता करण्यात आली आहे. आज गुरुवारी अर्थशास्त्राचा पुरस्कार घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विश्वशांती नोबेल पुरस्कार घोषित केला जाणार आहे. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा कोणाला मिळतो, याविषयी बरीच उत्सुकता आहे. मात्र विश्वशांती नोबेल पुरस्काराविषयी अधिकच उत्सुकता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप स्वत:ला हा पुरस्कार मिळावा, यासाठी आग्रही आहेत. त्यांना यंदा हा पुरस्कार दिला जातो की नाही, हे लवकरच समजणार आहे. जगात शांतता निर्माण करण्यासाठी आणि जगातील युद्धे थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, असे ट्रंप यांचे प्रतिपादन आहे. त्यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता निर्माण व्हावी, म्हणून प्रयत्नही चालविले आहेत. परिणाम एक दोन दिवसांमध्ये घोषित होणार आहे.