कार-टँकर अपघातात महिलेसह तिघेजण गंभीर जखमी
कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुदगा येथील दुर्घटना
कारवार : कार आणि टँकर दरम्यान झालेल्या अपघातात कारमधील एका महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुदगा येथे हमरस्ता क्रमांक 66 वर घडला. कारमधील एअरबॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, गोवा येथील दोन कुटुंबातील आठ जण कारमधून अंकोलाकडे निघाले होते. त्यावेळी तामिळनाडूतील टँकर अंकोलाहून कारवारकडे येत असताना कार आणि टँकर दरम्यान अपघात झाला. या अपघातामुळे कारवार आणि अंकोला दरम्यानची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे अपघात स्थळापासून रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय हमरस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. कारवार ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 चे बांधकाम करणाऱ्या आयआरबी बांधकाम कंपनीने चुकीच्या पद्धतीने हमरस्त्यावर डीवायडर घातल्याने हा अपघात झाला आहे, असे मत स्थानिकांनी नोंदविले आहे.