राज्यातील तिघांना पद्मश्री
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 2025 सालातील पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात असाधारण कामगिरीबद्दल कर्नाटकातील वेंकप्पा अंबाजी सुगतेकर, भीमव्वा दो•बाळप्पा शिळ्ळेक्यात, डॉ. विजयलक्ष्मी देशमाने या तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
वेंकप्पा अंबाजी सुगतेकर
कधीही शाळेत न गेलेले वेंकप्पा अंबाजी सुगतेकर हे बागलकोट येथील रहिवासी आहेत. लोककला प्रकारात येणाऱ्या गोंधळ गीतांमुळे ते परिचित आहेत. हजारहून अधिक गोंधळ सादर केल्याचा लौकिक त्यांनी मिळविला आहे. त्यांनी देवीची स्तुतीगीते, तात्विक श्लोक व इतर विषयांवर गीतरचना केल्या आहेत. कोणताही मोबदला न घेता त्यांनी अनेकांना गोंधळ सादरीकरणाची कला शिकविली आहे. 81 वर्षीय वेंकप्पा हे मागील 71 वर्षांपासूक गोंधळ सादर करतात. 150 हून अधिक आख्याने सादर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 110 व्या ‘मन की बात’मध्ये वेंकप्पा यांचे गुणगाण केले होते. 2022 मध्ये त्यांना जानपद विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आला. कर्नाटक सरकारने राज्योत्सव पुरस्कारानेही त्यांना गौरविले आहे.
भीमव्वा दो•बाळप्पा शिळ्ळेक्यात
कोप्पळमधील पारंपरिक शिळ्ळेक्यात कुटुंबातील असणाऱ्या भीमव्वा या कळसुत्री बाहुल्यांची कला सादर करण्यात पारंगत आहेत. मागील 25 वर्षांपासून त्यांनी ही कला जोपासली आहे. त्यांनी विविध कठपुतळी कला सादरीकरणाने देश-विदेशातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. उतारवयातही कळसुत्री बाहुल्यांचा खेळ सादर करतात. अमेरीका, इराण आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये प्राचीन भारतीय कळसुत्री बाहुल्यांची कला सादर करणाऱ्या पथकामधील त्या प्रमुख सदस्या आहेत. आपल्या वाक्चातुर्याने आणि समयोचित संवादाने प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले आहे.
डॉ. विजयलक्ष्मी देशमाने
कर्करोगाच्या रुग्णांसाठी डॉ. विजयलक्ष्मी देशमाने या आशेचा किरण आहेत. सुमारे दोन दशकांपासून बेंगळूरच्या किडवाई कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत आहेत. रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्या त्याग, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीने काम करतात. कलबुर्गी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. एमबीबीएम, एम. एस. (जनरल सर्जन), एफएआयएस पदवीधर झाल्यानंतर त्यांनी किडवाई मेमोरियल इस्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी येथ प्राध्यापक म्हणून सेवा सुरु केली होती. अमेरीका, स्वीडन, मुंबर्अ, कोलंबो येथे प्रतिनिधी म्हणून डॉ. विजयलक्ष्मी यांनी भेट दिली आहे. वैद्यकीय सेवेतील योगदानासाठी अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. कलश पुरस्कार, राष्ट्रीय रत्न, वैद्यकीय उत्कृष्टता पुरस्कार, शिरोमणी पुरस्कार, 1999चा वुमन ऑफ द इयर या पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. 2003 व 2004 मध्ये इंटरनॅशनल स्टडी सर्कलने त्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते.