For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ती’ दोन्ही प्रकरणे सीआयडीकडे वर्ग

06:58 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ती’ दोन्ही प्रकरणे सीआयडीकडे वर्ग
Advertisement

पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची माहिती : लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत अपशब्द प्रकरण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने अनेक नाट्यामय घडामोडी घडल्या. या एकंदरीत प्रकरणाबाबत हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेली दोन्ही प्रकरणे सरकारच्या सूचनेवरून बेळगाव पोलिसांनी अधिक तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केली आहेत.

Advertisement

हलगा येथील सुवर्णविधानसौधमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनादरम्यान भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे त्याचे पडसाद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दि. 19 रोजी उमटले. सी. टी. रवी विधान परिषद सभागृहाकडे जात असताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी त्यांची अडवणूक करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मंत्री हेब्बाळकर यांनी सी. टी. रवी यांच्या विरोधात हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. त्याचदिवशी सी. टी. रवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा निषेध करत भाजपतर्फे सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी आंदोलन केले.

सी. टी. रवी यांचा थेट एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा बेत होता, असा आरोप भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने केल्याने पोलिसांनी सी. टी. रवी यांना जिवे मारण्याचा धमकी देण्याचा ठपका ठेवत 10 अज्ञातांवर रविवार दि. 22 रोजी रात्री सुमोटो गुन्हा दाखल केला. सरकारतर्फे पोलीस निरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी फिर्याद दिली. ही दोन्ही प्रकरणे हायप्रोफाईल बनल्याने गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या सूचनेवरून बेळगाव पोलिसांनी अधिक तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे लवकरच सीआयडी अधिकारी बेळगावला येऊन या प्रकरणांची चौकशी करणार आहेत.

खबरदारीसाठी हलविले विविध पोलीस ठाण्यात : पोलीस आयुक्त

सी. टी. रवी यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रात्रभर फिरविल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याबाबत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. सी. टी. रवी यांना ताब्यात घेतल्यानंतर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी जास्त लोक जमल्याने तेथून खानापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथेही त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते जमल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याठिकाणी समर्थक आणि विरोधीदेखील येण्याची शक्यता होती. त्यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याचा संभव होता. त्यामुळे त्यांना पुन्हा रामदुर्गला हलविण्यात आले. त्याकाळात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आहार आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरणात सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.