तामिळनाडूत पुरामुळे तीन जणांचा मृत्यू
बचावकार्यात सैन्याचा सहभाग
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये सध्या पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत. तामिळनाडूत पाऊस आणि पूरामुळे निर्माण झालेल्या संकटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या थुटुकुटी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी 525 मिलीमीटर इतका पाऊस पडला, यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सद्वारे अन्नाची पाकिटे आणि अन्य आवश्यक सामग्री पाडविण्यात येत आहे.
भारतीय सैन्याने पूरग्रस्त थुटुकुडी जिल्यहात शेकडो लोकांना वाचविले आहे. पूरसदृश स्थितीमुळे अनेक भागांमध्ये लोक अडकून पडले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरइफ, सैन्य आणि वायुदलाकडून बचावकार्य राबविले जात आहे. जलमग्न भागांमध्ये तटरक्षक दलाचे जवान लोकांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवत आहेत. वायुदलाने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. लोकांना एअरलिफ्ट करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे दक्षिण तामिळनाडूतील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. तिरुनेलवेली आणि तूतीकोरिन जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये सुमारे 670 मिमी आणि 932 मिमी पाऊस पडल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. अनेक स्थानकांमध्ये पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे थिरुचेंदुर आणि तिरुनेलवेली स्थानकादरम्यान धावणाऱ्या एका रेल्वेत सुमारे 800 प्रवासी अडकून पडले होते. पुडुकोट्टई, तंजावुर, थिरुवर, नागापट्टणम, रामनाथपुरम आणि शिवगंगा या जिल्ह्यांमध्ये आणखी काही दिवस अतिवृष्टी होण्याचा अनुमान हवामान विभागाने वर्तविला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांना पूरस्थितीची माहिती देणार आहेत. तामिळनाडूच्या दक्षिण भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला असून तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. पूरस्थिती पाहता एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्यांना कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तूतीकोरिन आणि तेनकासीमध्ये तैनात करण्यात आले आहे.