For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राज्यघटना हा सर्वात पवित्र ग्रंथ’

06:51 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘राज्यघटना हा सर्वात पवित्र ग्रंथ’
Advertisement

संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार : सर्वोच्च न्यायालयातही घटनादिन साजरा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘भारताची राज्यघटना हा देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. ही घटना निर्माण करण्यासाठी घटनासमितीने साधारणत: 3 वर्षे अपार कष्ट केले. त्यांच्या परिश्रमाचे फळ म्हणून हा ग्रंथ भारतीयांना उपलब्ध झाला आहे. या ग्रंथामुळे देशवासियांच्या मनात आपण एक राष्ट्र आहोत ही भावना जागृत झाली आणि ती आजही जागृत आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्षदिनी संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करताना काढले.

Advertisement

या घटनेमुळेच देश एकसंध आणि प्रगतीपथावर राहिला आहे. घटना निर्मितीच्या कार्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि इतर मान्यवरांचे योगदान अविस्मरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेला एक प्रागतिक दिशा आणि निश्चित आकार दिला. घटनानिर्मितीच्या कार्यात 15 महिला विदुषींचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. तीन वर्षांमध्ये या सर्व थोर मान्यवरांनी घटनानिर्मिती केली. ही घटना आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या मूल्यांचा एक अपूर्व ठेवा आहे. घटनेमुळे न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य, समानता आणि  बंधुत्व या मूल्यांची पायाभरणी झाली, असेही प्रतिपादन राष्ट्रपतींनी या प्रसंगी केले.

लोकशाहीची जननी

घटना ही भारताच्या लोकशाहीची जननी आहे. तिने भारतीयांना प्रगतीच्या विशेष संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. याच घटनेच्या आधारे केंद्र सरकारने समाजातील दुर्बळ वर्गांच्या हितासाठी अनेक योजना आणि उपक्रम लागू केले आहेत. प्रशासन, संसद आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्रितपणे देशाच्या सर्वांगीण हितासाठी कार्य करावे हा घटनेचा संदेश आहे. याच घटनेने भारताच्या आर्थिक प्रगतीचाही पाया घातला असून आर्थिक सुधारणांसाठी अनेक उपाययोजना याच आधारावर करण्यात आल्या आहेत, अशी भलावण त्यांनी यावेळी केली.

उपराष्ट्रपतींकडूनही प्रशंसा

उपराष्ट्रपती जगदीप ढंकर यांनीही घटना, घटनाकार, घटनासमिती आणि इतर मान्यवर यांच्या देशाच्या उन्नतीतील योगदानाचे स्मरण त्यांच्या भाषणात केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनानिर्मितीतील विशेष योगदानावर त्यांनी भाषणात भर दिला. भारताचे एकसंधत्व, जागतिक महत्त्व आणि प्रगती यांचा पाया घटना हाच आहे. प्रत्येकाने घटनेचा आदर ठेवावयास हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयातही घटनादिन

घटनेचा 75 वा दिन सर्वोच्च न्यायालयातही साजरा करण्यात आला आहे. या प्रसंगी सरन्यायाधीश संजीव खन्ना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. ‘घटना ही केवळ एक कायदेशीर कागदपत्र नाही. ती भारताच्या सर्वकालीन चैतन्याचा स्रोत आहे,’ असे उद्गार घटना देशाला अर्पण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढले होते. त्या उद्गारांचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिले.

प्रत्येक आवश्यकता केली पूर्ण

भारताच्या राज्यघटनेने देशाची प्रत्येक आवश्यकता समर्थपणे पूर्ण केली आहे. याच घटनेमुळे आज जम्मू-काश्मीर आपला प्रथम घटनादिन साजरा करीत आहे. घटना भारताची सामर्थ्यवर्धिनी आहे. तिने प्रदान केलेल्या बळामुळेच आम्ही आज दहशतवादाला नमवू शकलो. सर्जिकल स्ट्राईक करू शकलो. देशाच्या प्रगतीसाठी योग्य ते निर्णय घेऊ शकलो. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. आज या हल्ल्याचा स्मरण दिवस आहे. अनेक आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देण्याचे सामर्थ्य आणि शक्ती आम्हाला घटनेनेच प्रदान केली आहे. आणीबाणीच्या काळात घटनेची पायमल्ली झाली. तथापि, त्या संकटही भारताच्या लोकांनी घटनेने दिलेल्या अधिकारांमुळेच परतवले. स्वतंत्र भारताच्या 78 वर्षांच्या काळात अशा अनेक आव्हानांना यशस्वीरित्या मागे हटविण्याचे सामर्थ्य घटनेनेचे दिले आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.

सरन्यायाधीशांकडून गौरव

भारताचे नूतन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीही याप्रसंगी घटनेची प्रशंसा केली. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका घटनेचे राखणदार अशी आहे. घटनेने न्यायव्यवस्थेला दिलेल्या अधिकारांमुळे आज न्यायव्यवस्था जनतेचा आधार बनली असून सर्वोच्च न्यायालयाने घटनेचे राज्य ही संकल्पना पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे योगदान केले आहे, अशा अर्थाचे वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणात केले.

जम्मू-काश्मीरसह इतरत्रही कार्यक्रम

मंगळवारी 75 व्या घटनादिनानिमित्त सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये घटनेच्या उद्देशिकेचे (प्रिअँबल) वाचन करण्यात आले. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत इतिहासात प्रथमच घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यांच्या विधानसभांमध्येही उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उद्देशिकेत घटनेच्या उद्देशांची माहिती देण्यात आली आहे.

घटनादिन देशभरात साजरा

ड 26 नोव्हेंबर हा दिवस घटनादिन म्हणून प्रतिवर्ष साजरा करण्याची पद्धत

ड या वर्षी घटनानिर्मितीचे 75 वे वर्ष असल्याने घटनादिनाला विशेष महत्त्व

ड 75 व्या घटनादिनानिमित्त राज्यांच्या विधनासभांमध्ये घटना उद्देशिका वाचन

ड इतर अनेक महत्त्वाच्या स्थानीही 75 वा घटनादिन उत्साहात झाला साजरा

Advertisement
Tags :

.