For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याच्या नारळासमोर तीन अडथळे

01:07 PM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याच्या नारळासमोर तीन अडथळे
Advertisement

पावसामुळे गळून पडले नारळ : ‘माईटस्’ रोगाने त्रस्त झाले माड,पाडेलींची वाढती कमतरता

Advertisement

संदीप कांबळे /पणजी

गोव्यात नारळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी यंदा सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नारळ गळून पडले आहेत. एका बाजूने पाडेली मिळेनात तर दुसरीकडे ‘माईट्स’ या रोगामुळे नारळाचे उत्पादन जवळजवळ 40 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे ऐन चतुर्थी उत्सवाच्या काळात गोव्यासाठी नारळ ही समस्याच बनून राहणार आहे. राज्यातील पारंपरिक आहारात नाराळ हा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. नारळ असल्याशिवाय कोणताच पदार्थ किंवा स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. नारळ हा गोमंतकीय जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु सध्या नारळ उत्पादन घटत चालल्याने भविष्यात चिंतेची बाब बनली आहे.

Advertisement

नारळापुढे तीन मोठे अडथळे

‘माईट्स’ रोगामुळे सुमारे 40 टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. पावसामुळे नारळ मोठ्या प्रमाणात गळून पडलेले आहेत. त्यामुळे ऐन चतुर्थीच्या काळात गणेशचतुर्थीसाठी कर्नाटक आणि केरळमधूनही नारळ मोठ्या प्रमाणात आणावे लागणार आहेत. गोव्याच्या नारळ उत्पादनात पाडेलीचा अभाव, यंदा पडलेला मुसळधार पाऊस आणि माईट्स रोग हे तीन मोठे अडथळे आहेत.

चतुर्थीला हवेत अधिक नारळ 

पाडेली एका झाडावर चढण्यास किमान 100 ऊपये व त्याहून अधिक ऊपयांची मागणी करतात. त्याशिवाय एका नारळाची अपेक्षा ठेवतात. चतुर्थी उत्सवात गणेशपूजेला किमान 5 नारळ लागतात. माटोळीसाठी तर उतरवलेली 1 पेण  लागते. गोडधोड किंवा उकडीचे मोदक, आमटी, भाजी, कोशिंबिर, सोलकढी केली तरी नारळाचा रस लागतो. पंचखाद्यालाही नारळ महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा गणेशचतुर्थी काळात नारळ प्रचंड प्रमाणात लागणार आहे. म्हणून नारळाचाच जर तुटवडा भासू लागला तर चतुर्थीत नारळाला बाजूला ठेवू शकतो का, नारळ विरहीत चतुर्थी साजरी होऊ शकते का आदी प्रश्न आहेत.

गोव्यातील उत्पादित झालेला नारळ हा चवीला उत्कृष्ट. त्याचबरोबर त्याचे पाणीही अमृततूल्य असते. परंतु हा नारळ सध्या सर्वच ठिकाणी उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. काही व्यावसायिक गोव्यातीलच नारळ म्हणून विक्रीस ठेवल्याचे ग्राहकांना सांगून एकप्रकारे फसवणूकच करीत आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून आपण नारळ विक्रीचा व्यवसाय करीत आहे. गोव्यात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी मागणी तेवढा पुरवठा असे नारळ उपलब्ध होत नाहीत. काहीवेळा तो कर्नाटक किंवा इतर ठिकाणाहून आणावाच लागतो, हे मान्य करायला हवे. नारळ हा गोव्याच्या जीवनातील अविभाज्य घटक असल्याने दुसऱ्या राज्यांवर अवलंबून न राहता गोव्यातच तो मोठ्या प्रमाणात पिकण्यासाठी सरकारने एखादी प्रभावी योजना राबवायला हवी.

युवकांनी पाडेली बनण्यासाठी पुढे यावे

गोव्यात नारळ मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. फलोत्पादन महामंडळामार्फत महिन्याला पाच हजार नारळ विकले जातात. गावठी नारळ मागितला जातो. त्यामुळे गावठी नारळाची राज्याला गरज आहे. नारळ उत्पादकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पाडेलींची कमतरता जाणवत असल्याने वेळेत नारळ उतरवला जात नाही. पाडेलींचा रोजंदारी खर्च भरमसाठ असल्याने शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळत नाही. राज्यातील युवकांनी पाडेली व्यवसायात येण्यास मागेपुढे पाहता कामा नये.

- आमदार प्रेमेंद्र शेट,अध्यक्ष, फलोत्पादन महामंडळ

नारळांबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा

सध्या नारळ उत्पादकांकडून फलोत्पादन महामंडळाला नारळ उपलब्ध होत असले तरी भविष्यात ते किती प्रमाणात उपलब्ध होतील, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कृषी खात्यामार्फत अनेक योजना आहेत, ज्या उत्पादन वाढविण्याच्यादृष्टीने बनविलेल्या आहेत. कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयांमार्फत पाडेलींचे प्रशिक्षण देण्याबाबतही पुढाकार घेतला जातो. आज जरी पाडेली सापडत नसले तरी पाडेलीचे प्रशिक्षण घेण्यास युवकांनी पुढे आल्यास ही समस्याही सुटू शकते.

- रवी नाईक, कृषी मंत्री

Advertisement
Tags :

.