पाक संघात तीन नवे चेहरे
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जिणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने पाक संघाची घोषणा केली असून त्यामध्ये तीन नवोदितांचा समावेश केला आहे. पाकची ही कसोटी मालिका डिसेंबर महिन्यात सुरू होईल.
या मालिकेसाठी पाक कसोटी संघामध्ये सईम अयुब, अमीर जमाल आणि खुर्रम शेहजाद या तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. दुखापतीच्या समस्येतून अद्याप पूर्ण बरा न झाल्याने वेगवान गोलंदाज नसीम शहाला वगळण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी 18 जणांचा पाक संघ जाहीर केला असून शान मसूदकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. वहाब रियाजचे संघात पुनरागमन झाले आहे. तर मीर हमजाला या दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या पाक संघातील नऊ खेळाडूंनी आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी संघातील आपले स्थान राखले आहे. पाकच्या मीर हमजाने आपला शेवटचा कसोटी सामना गेल्या जानेवारीत न्यझीलंड विरुद्ध खेळविला होता. त्यानंतर त्याला लंकन दौऱ्यासाठी वगळण्यात आले होते. या दौऱ्यासाठी माजी कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद वासिम ज्युनिअर यांनी संघातील स्थान कायम राखले आहे.
पाकचा क्रिकेट संघ 30 नोव्हेंबरला लाहोरमधून ऑस्ट्रेलियाला प्रयाण करेल. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या पाक संघातील खेळाडूंकरीता रावळपिंडीमध्ये सरावाची शिबिर 23 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केले आहे. उभय संघातील पहिली कसोटी पर्थ येथे 14 ते 18 डिसेंबर, दुसरी कसोटी मेलबोर्न येथे 26 ते 30 डिसेंबर, तिसरी आणि शेवटची कसोटी सिडनीत 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळविली जाईल.