बंगालमधून आणखी तिघांना अटक
समग्र शिक्षा अभियान फसवणूक प्रकरण : खात्यातून गायब केले आहेत 5 कोटी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या खात्यातील पाच कोटी रुपये गायब करण्याच्या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी आणखी तीन संशयितांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अटक केलेल्या दोन संशयितांना गोव्यात आणले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अन्य एका संशयिताला गोव्यात आणले जात आहे.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये अलामिन मजीद मोंडल (35, राउतारी, तेंटुल बारिया, नादिया, पश्चिम बंगाल) विद्याधर माधवानंद मल्लिक (52 राउतारी, 38, अविनाश बॅनर्जी लेन, छोटो रामतळा, हाओरा, हावडा, पश्चिम बंगाल) यांचा समावेश असून त्यांना गोव्यात आणले आहे. संशयित सुमंता संतोष मोंडल (40 वर्षे, रा. नाजीरपूर, नादिया, पश्चिम बंगाल) याला तेहट्टा न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन गोव्यात आणले जात आहे.
या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी दोन संशयित हे खातेधारक असून त्यांनी केवळ पैसे मिळत असल्याने आपले खाते वापर करण्यासाठी दिल्याचा गुन्हा केला आहे. अटक पेलेले संशयित खातेदारांना शोधून त्यांच्या बँक खात्यासह त्यांचे सीमकार्ड, एटीएम कार्ड आणून मुख्य संशयिताला देत होते. त्या बदल्यात खातेधारकाला खाते वापरण्यासाठी पैसे दिले जात होते. मात्र या तिन्ही संशयितांना त्यांच्या कामाचा मोठा मोबदला मिळत होता.
गेल्या महिन्याच्या सुऊवातीला दोन संशयितांना अटक केल्यानंतर पर्वरी पोलिसस्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या देखरेखीखाली पर्वरी पोलिसस्थानकात दोन पथके तयार करून नवी दिल्ली आणि पश्चिम बंगालला रवाना झाली होती. पुढे तांत्रिक देखरेख आणि गुप्त माहितीच्या आधारे पहिल्या पथकाने करीमपूर पोलिसस्थानकाच्या हद्दीतून संशयित सुमंता मोंडल याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर असे उघड झाले की उर्वरित दोन संशयित दिल्लीला पळून गेले आहेत. त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्यांना पहाडगंज परिसरात ताब्यात घेतले. सदर दोन्ही संशयितांची ओळख पटली आणि त्यांना अटक करून गोव्यात आणले.
ही कारवाई पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सीताराम मळीक, मंदार परब, साहिल वायंगणकर, कॉन्स्टेबल महादेव नाईक, हऊण शेख, तुषार राऊत, नितेश गावडे, आकाश नाईक आणि हेमंत गावकर यांनी केली आहे. या प्रकरणात अनेकांचा समावेश असून हे एक मोठे रॅकेट आहे. निरीक्षक राहुल परब, पर्वरी उपविभागीय अधिकारी विश्वेश कर्पे आणि उत्तर गोवा अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.