एचएसआरपी नंबरप्लेटसाठी तीन महिने मुदतवाढ
परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांची विधानपरिषदेत माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
एचएसआरपी’ नावाखाली ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत वाढविण्यात येत असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. राज्यातील जुन्या वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. याकरिता देण्यात आलेली मुदत संपत आली असून अद्याप अनेकांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे ही मुदत तीन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री रामलिंगारे•ाr यांनी दिली.
बुधवारी विधानपरिषदेत काँग्रेसचे सदस्य मधू जी. मादेगौडा यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री रामलिंगारेड्डी यांनी वरील माहिती दिली. राज्यात आतापर्यंत केवळ 18 लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आले आहेत. अद्याप अनेक वाहनांची एचएसआरपी नोंदणी बाकी आहे. शिवाय याविषयी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी विनंती मादेगौडा यांनी केली.
हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे ही ऑनलाईनवर केली जाणारी कॅशलेस पारदर्शक प्रक्रिया आहे. अशा नंबरप्लेटच्या नावाने बोगस वेबसाईटवर लक्ष ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे सक्तीचे केले आहे. यामुळे वाहने वापरून गुन्हे करणाऱ्यांना चाप लावणे आणि रस्त्यांवरील वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. शिवाय नंबरप्लेटचे विद्रुपीकरण, फन्सी नंबरप्लेट किंवा बोगस नंबरप्लेट बसविण्याला आळा घालणे यामुळे शक्य होणार आहे, असे मंत्री रामलिंगारे•ाr यांनी सांगितले.
केंद्रीय मोटार वाहन कायदा-1989च्या नियम 50 नुसार निश्चित केलेल्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची सूचना केली आहे. अशा प्रकारच्या नंबरप्लेटचा पुन्हा वापर करणे अशक्य आहे. त्यावर वर्तुळाकार क्रोमियम आधारीत होलोग्राम वाहनाच्या समोरील आणि मागील बाजूच्या नंबरप्लेटवर लावण्यात येतात. राज्यात एप्रिल 2019 पूर्वी अंदाजे 2.45 कोटी वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी वाहने रस्त्यावर धावत आहेत. वरील अंदाजे आकडेवारी विचारात घेतल्यास आतापर्यंत केवळ 9.19 टक्केच वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आले आहेत, अशी माहितीही रामलिंगारेड्डी यांनी दिली.