महाआघाडीत ‘तीन माकडं’ : पप्पू, अप्पू अन् टप्पू
दरभंगा येथील सभेत योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य : अखिलेश यादव, राहुल गांधी, तेजस्वी निशाण्यावर
वृत्तसंस्था/ दरभंगा
बिहारच्या दरभंगा येथील केवटीमध्ये आयोजित प्रचारसभेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडी आघाडीवर मोठा शाब्दिक हल्ला चढविला आहे. इंडी आघाडीची तीन माकडं पप्पू, टप्पू आणि अप्पू असून ते सत्य बोलणे, सत्य ऐकणे आणि सत्य पाहणे टाळतात असे उपरोधिक वक्तव्य योगींनी केले आहे. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराच्या अंतिम दिनी योगंनी केवटी आणि मुजफ्फरपूरच्या कंपनीबागमध्ये जाहीरसभेला संबोधित केले. यावेळी भाषणात योगींनी काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्ष अध्यक्ष अखिलेश यादव आणि राजद नेते तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले आहे.
महात्मा गांधींच्या तीन माकडांची गोष्ट लोकांनी ऐकली असेल. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका असा उपदेश गांधींनी दिला होता. इंडी आघाडीतही तीन माकडं आली आहेत. पप्पू, टप्पू आणि अप्पूच्या नावाने दिसून येत आहेत. पप्पू सत्य आणि चांगले बोलू शकत नाही. टप्पू सत्य पाहू शकत नाही आणि अप्पू सत्य ऐकू शकत नाही. या तिघांनाही रालोआ सरकारकडून करण्यात येणारी विकासकामे दिसून येत नाहीत. विकासकामांचा गंधच त्यांना ठाऊक नाही, हे तिघेही केवळ दुष्प्रचार करत नसल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
राहुल गांधींकडून देशाचा अपमान
काँग्रेस नेते राहुल गांधी भारताबाहेर जात स्वत:च्याच देशाला दुषणे देतात आणि अपमानित करतात. विदेशी लुटारूंचे गुणगान राहुल गांधींकडून केले जाते. हे तिघेही माफियांची गळाभेट घेत बिहारच्या सुरक्षेला धक्का पोहोचवत आहेत. तसेच हे तिघेही घुसखोरांचे पाठिराखे आहेत. राजदचे सरकार असताना बिहारमध्ये अनेक नरसंहार झाले. त्यावेळी मुली असुरक्षित होत्या, हेच लोक जनतेला जातीच्या नावावर विभागतात आणि श्रद्धेला धक्का पोहोचवत असल्याचा आरोप योगींनी केला आहे.
काँग्रेस, राजद, सप भगवान राम विरोधी
बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस तसेच त्यांचा भागीदार उत्तरप्रदेशात आहे. हे सर्व घोर हिंदूविरोधी आहेत. भगवान आणि माता जानकीचे द्रोही आहेत. जो रामाचा विरोधी असेल, तो आमचाही विरोधी असेल. काँग्रेस नेत्यांनी भगवान श्रीराम आणि माता जानकीच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला होता, काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात भगवान रामाच्या अस्तित्व नाकारणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. दुसरीकडे राम मंदिराची रथयात्रा रोखण्याचे काम राजदने केले होते. तर उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळीबार करवत अयोध्येला रक्तबंबाळ केले होते, अशी आठवण योगींनी सभेत करून दिली.
घुसखोरांना हाकलू
राजद आणि काँग्रेस सत्तेवर येताच बिहार जळू लागतो. आही आमच्या सीमावर्ती शहरांमधून घुसखोरांना हाकलून लावू. बिहारच्या विकासाचा वेग कायम राहण्यासाठी रालोआचे सरकार आवश्यक आहे. याकरता एकजूट होत रालोआच्या उमेदवारांना विजयी करत पाटण्यात पाठवा. डबल इंजिनचे सरकार कुठल्याही भेदभावाशिवाय शासकीय योजनांचा लाभ सर्वांना मिळवून देत आहे. विकास, वारसा आणि गरीब कल्याणासाठी काम होत असल्याचे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी लोकांना रालोआला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.