विनाअनुमती लडाखमध्ये पोहोचला चिनी नागरिक
सीमकार्डही केले खरेदी : पोलिसांनी घेतले ताब्यात
वृत्तसंस्था/ लेह
श्रीनगरमध्ये व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि लडाख तसेच काश्मीरच्या संवेदनशील भागांमध्ये विनाअनुमती पोहोचल्याप्रकरणी चीनचा नागरिक हु कॉन्गताईला ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्याच्या विरोधातील तपासाला वेग मिळाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याचा मोबाइल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून तो संवेदनशील माहिती विदेशात पाठवत होता का हे जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
29 वषींय हु कॉन्गताई हा 19 नोव्हेंबर रोजी पर्यटक व्हिसावर दिल्लीत आाल होता. त्याने विदेशी नोंदणी क्षेत्रीय कार्यालयात (एफआरआरओ) अनिवार्य नोंदणी न करता लडाखमधील लेह, जांस्कर आणि काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागांचा दौरा केल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिसा केवळ बौद्ध धार्मिक स्थळ म्हणजेच वाराणसी, आगरा, नवी दिल्ली, जयपूर, सारनाथ, गया आणि कुशीनगरपर्यंतच प्रवासाची अनुमती देणारा होता. तरीही तो जांस्कर येथे तीन दिवस राहिला आणि अनेक मठांसोबत सामरिक महत्त्वाच्या ठिकाणांवर गेला होता.
संवेदनशील क्षेत्रांचा दौरा
तपास यंत्रणांनुसार त्याच्या प्रवाससूचीत हावरणचे बौद्ध मठ, सैन्याच्या व्हिक्टर फोर्स मुख्यालयानजीक अवंतीपोराचे बौद्ध अवशेष, हजरतबल दर्गा, शंकराचार्य हिल, डल सरोवर आणि मुगल गार्डन यासारखी ठिकाणे सामील होती. भारतात पोहोचल्यावर त्याने त्वरित खुल्या बाजारातून भारतीय सिमकार्ड खरेदी केले होते, यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंता वाढल्या आहेत. त्याच्या ब्राउजिंग हिस्ट्रीत सीआरपीएफची तैनात, कलम 370 हटविण्यासारख्या विषयांशी निगडित ऑनलाइन सर्च मिळाले आहेत. त्याने डिजिटल हिस्ट्री नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का याचाही शोध यंत्रणा घेत आहेत.
चौकशीत अनभिज्ञ असल्याचा प्रयत्न
चौकशीदरम्यान हु कॉन्गताईने व्हिसा नियमांच्या उल्लंघनाविषयी अनभिज्ञ असल्याचा दावा केला आहे. बोस्टन विद्यापीठातून शिक्षण घेतले असून मागील 9 वर्षांपासून अमेरिकेत राहत असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तो स्वत:ला ट्रॅव्हल एंथूजियास्ट ठरवत असून त्याच्या पासपोर्टमध्ये अमेरिका, न्युझीलंड, ब्राझील, फिजी आणि हाँगकाँग यासारख्या देशांच्या प्रवासाची नोंद आहे. सध्या त्याला श्रीनगर विमातळानजीक हम्हामा पोलीस स्थानकात ठेवण्यात आले असून तेथे सुरक्षा यंत्रणा त्याच्या हालचालींमागील उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यावर त्याच्या हालचालींवरून महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.