For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

07:55 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू
Advertisement

एकाचा मृतदेह सापडला : आलमट्टी डाव्या कालव्यानजीकची घटना

Advertisement

वार्ताहर/ विजापूर

एका कुटुंबातील बहीण, भाऊ आणि पुतण्याचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी शिरोळ रस्त्याजवळील आलमट्टी डाव्या कालव्यात घडली आहे. बसम्मा चिन्नप्पा कोन्नूर (वय 20), तिचा भाऊ संतोष चिन्नप्पा कोन्नूर (वय 18) आणि पुतण्या रवी हणमंत कोन्नूर (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या शोधमोहिमेनंतर संतोषचा मृतदेह संध्याकाळी सापडला, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसम्मा कपडे धुण्यासाठी कालव्याजवळ गेली असता ती पाण्यात घसरून पडली. हे पाहून तिचा भाऊ संतोषने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना त्यांना वाचवण्यासाठी पुतण्या रवी याने देखील उडी मारली. मात्र पाण्याचा तीव्र प्रवाह आणि खोल पाण्यामुळे तिघेही वर येऊ शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शी रूपा (बसम्माची वहिनी) आणि हणमव्वा (बसम्माची बहीण) यांनी सांगितले.

Advertisement

माहिती मिळताच घटनास्थळी सीपीआय महमूद फसियुद्दीन आणि पीएसआय संजय तिप्पर•ाr यांनी भेट देऊन पाहणी केली. आलमट्टी केबीजेएनएल अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रवाह थांबवण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दलाच्या प्रभारी अधिकारी बसवराज बिरादार यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या कर्मचाऱ्यांनी उर्वरित दोघांचा शोध सुरू ठेवला आहे. या घटनेची नोंद मुद्धेबिहाळ पोलिस स्थानकात झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच भाजपा शेतकरी मोर्चाचे राज्याध्यक्ष व माजी आमदार ए. एस. पाटील नडहळ्ली घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला व घटनेची माहिती घेतली. त्यांनी वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन दिले. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून प्रत्येक मृताला 5 लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

बसम्मा हिचा ठरला होता विवाह

बसम्मा ही पदवीधर होती. ती सुरेश चिन्णण्ण मुग्गोल या युवकावर गेली दोन वर्षांपासून प्रेम करत होती. एकदा दोघे घरातून पळून गेले होते, त्यावेळी बागलकोट जिह्यातील रामपूर पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवले गेले होते. दोघांना शोधून मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी लग्न करण्याची लेखी संमती दिली होती. पुढील महिन्यात दोघांचे लग्न होणार होते, पण बसम्माच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement
Tags :

.