कार अपघातात तिघेजण ठार
हगडीहाळ क्रॉसनजीकची घटना : एकजण गंभीर जखमी
वार्ताहर/विजापूर
बसवण बागेवाडी तालुक्यातील उक्कली येथून विजापूरकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला धडकून पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात वाहनातील तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी हगडिहाळ क्रॉसजवळ घडली. बिरप्पा गोडेकर (वय 30, रा. उत्तनाळ), हनुमंत कडलीमट्टी (वय 25), यमनप्पा नाटीकर (वय 28, रा. जुमनाळ) अशी मृतांची नावे आहेत. तर उमेश बजंत्री (रा. जुमनाळ) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, कार क्र. केए 28 झेड 0379 मधून बिरप्पा गोडेकर, हनुमंत कडलीमट्टी, यमनप्पा नाटीकर, उमेश बजंत्री हे उक्कली येथून विजापूरकडे येत होते. सदर वाहन भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, हगडिहाळ क्रॉसजवळ रस्त्यावर वळण घेण्याचा प्रयत्न करत असताना, कारचे नियंत्रण सुटून ती शेतातील झाडाला कार धडकली. त्यानंतर वाहन पलटी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची नोंद विजापूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरु आहे.