खवळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात तिघे ठार
दोन वनरक्षकांचा समावेश : आसाममधील सोनितपूरमध्ये जंगली हत्तीची दहशत
वृत्तसंस्था/ तेजपूर
आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात शनिवारी वन्य हत्तीने केलेल्या हल्ल्यात दोन वनरक्षकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. वन कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना एक जंगली हत्ती जवळच्या ढेकियाजुली जंगलातून भरकटला आणि धिराई माजुली गावात घुसला. त्यानंतर या हत्तीने केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर वन अधिकारी जखमी झाल्याचे पश्चिम तेजपूरचे विभागीय वन अधिकारी निपेन कलिता यांनी सांगितले.
वनरक्षक कोलेश्वर बोरो आणि बिरेन रावा अशी मृतांची नावे असून जतिन तंती या स्थानिक रहिवाशालाही प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिवाकर मलाकर यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हत्तीला पुन्हा जंगलभागात परतवून लावण्याचे प्रयत्न वन विभागाकडून दिवसभर सुरू होते.