ओर्डा कांदोळी येथे चॉपर हल्ल्यात तिघेजण जखमी
संशयित तिघेही अद्याप फरारी : कळंगुट पोलिसांत गुन्हा नोंद
म्हापसा : ओर्डा कांदोळी येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघांवर चॉपरने वार करण्यात आल्याने तिघेही जखमी झाले आहेत. या घटनेने या भागात भीतीचे वातावरण पसरले असून कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी सॅम मायकर याच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संशयित अद्याप फरार आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती. ओर्डा येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोन गटात भांडण झाले होते. त्यानंतर संशयितांनी मिथून शिवानंद पवार, अमित राठोड व अशोक चव्हाण यांच्यावर घरी जाऊन चॉपरने वार केल्याने ते जखमी झाले आहेत. ही हाणामारी म्हणजे गँगवॉरचा प्रकार असल्याची माहिती स्थानिकांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली.
सॅम मायकर राठोड याच्या नेतृत्वाखली या भागात अन्य काहीजणांचा वावर आहे. कळंगुट पोलिसांच्या नावाखाली हे गुंड दादागिरी करीत असतात. तसेच धमकी देऊन दुकानात जाऊन हप्ते गोळा करतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असून राजकीय आशीर्वादाने हे सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सॅम मायकर राठोड याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि अर्ध्यातासाने सोडून दिले.
पोलिसांत लेखी तक्रार
या प्रकरणी अजित रुपसिंग राठोड (वय 26) यांनी कळंगुट पोलिस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे. बर्फाच्या फॅक्टरीजवळ संशयित सॅम मायकर राठोड याने रात्री आपला मित्र मिथून शिवानंद पवार याला पूर्ववैमनस्यातून चॉपर, कोयता व चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर अशोक चव्हाण यालाही मारहाण केली. कळंगुट पोलिसांनी प्रथम पंचनामा करून जखमी तिघांनाही कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर गोमेकॉत पाठविण्यात आले.
आमदार लोबो यांची घटनास्थळी भेट
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून त्यांनी आढावा घेतला. फरारी संशयितांना शोधून काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली. आपल्या मतदारसंघात गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीष वायंगणकर अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सॅम मायकर राठोड याचा या भागात दरारा असून येथील नागरिक त्याला घाबरतात. काही राजकारण्यांनी आपली वोटबँक सांभाळण्यासाठी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आसला दिला असल्याचे सांगण्यात आले.