इस्रायली सैनिकांकडून तीन ओलिसांची हत्या
आपल्याच नागरिकांना मारल्याची कबुली : जनतेत रोष
वृत्तसंस्था/ गाझापट्टी
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली लष्कराने मोठी चूक केली आहे. 15 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीमध्ये केलेल्या कारवाईदरम्यान हमासने ओलीस ठेवलेल्या आपल्याच तीन नागरिकांना लष्कराने गोळ्या घालून ठार केले. तीनही ओलिसांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर इस्रायलमधील काही लोक आपल्याच सैन्याच्या या कारवाईविरोधात आंदोलन छेडताना दिसून आले.
इस्रायली सुरक्षा दलाने आपल्याकडून घडलेल्या कारवाईची रितसर माहिती जारी केली आहे. सुऊवातीला आपल्याला या लोकांपासून इस्रायली सैन्याला धोका असल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मृतदेहांजवळ पोहोचताच मृतांच्या ओळखीबाबत शंका आली. सदर तिघेजण इस्रायलचे नागरिक असल्याचे उघड झाले. मृत ओलिसांपैकी योतम हैम आणि समेर अल-तलाल्का अशी दोघांची नावे आहेत, असे इस्रायली सुरक्षा दलाने स्पष्ट केले.
इस्रायल-हमास युद्धाला आता 70 दिवस पूर्ण झाले आहेत. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात गाझामधील 18 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्याचवेळी हमासच्या हल्ल्यात 1,200 इस्रायली मारले गेले आहेत.