होडी उलटल्याने तीन मच्छीमार बेपत्ता
अरबी समुद्रातील घटना : एकाचा मृतदेह भटकळ तालुक्यातील होन्नेगद्दे येथे आढळला
कारवार : लाटांच्या तावडीत सापडून सांप्रदायिक होडी उलटल्याने अरबी समुद्रात बेपत्ता झालेल्या चार मच्छीमार बांधवांपैकी एकाचा मृतदेह गुरुवारी भटकळ तालुक्यातील होन्नेगद्दे येथे आढळून आला. जाळीकोडी येथील रामकृष्ण मंजू मोगेर (वय 40) यांचा मृतदेह होन्नेगद्दे येथे समुद्रात तरंगताना आढळून आला आहे. ही दुर्घटना बुधवारी भटकळ तालुक्यातील अळवेकोडी-तंगीनगुडी जवळच्या अरबी समुद्रात घडली होती. या दुर्घटनेबद्दल अधिक माहिती अशी, भटकळ तालुक्यातील जाली येथील मनोहर मोगेर आणि बेळ्ळे येथील राम खारवी यांच्या मालकीच्या पारंपारिक होडीतून सहा मच्छीमारी बांधव मासेमारीसाठी अरबी समुद्रात उतरले होते. अळवेकोडी तंगीनगुडी जवळच्या अरबी समुद्रात ते मासेमारी करीत असताना होडी लाटांच्या तावडीत सापडली आणि उलटली. त्यामुळे सहाही मच्छीमारी बांधव समुद्रात फेकले गेले.
या घटनेची माहिती मिळताच जवळपास मासेमारी करणाऱ्या अन्य मच्छीमारी बांधवानी घटनास्थळी धाव घेतली आणि मनोहर मोगेर आणि रामू खारवी या दोघाजणांना वाचविले. तथापि रामकृष्ण मंजू मोगेर (वय 40 रा. जालीकोडा), सतीश तिम्माण्णा मोगेर (वय 26 रा. अळवीकोडा), गणेश मंजुनाथ मोगेर (वय 27 रा. अळवीकोडी), आणि निश्चित मोगेर (वय 30 रा. शाली) हे चारजण समुद्रात बुडून बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी बुधवारीच प्रयत्न करण्यात आले. तथापि अपेक्षित यश आले नाही. गुरुवारी सकाळी शेकडो मच्छीमारी बांधवांनी होड्यामधून अळवीकोडी आणि घटना स्थळाजवळील समुद्र पिंजून काढला असता रामकृष्ण मंजू मोगेर यांचा मृतदेह होन्नेगद्दे येथे अरबी समुद्रात तरंगताना आढळून आला. अद्याप बेपत्ता असलेल्या निश्चित, सतीश आणि गणेश यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमारी बांधव, किनारपट्टी रक्षणदल आणि अन्य संघ संस्था झटत आहे.
जिल्हा पालकमंत्र्याची भेट
दरम्यान होडी दुर्घटनेची माहिती मिळताच बेंगळूर मुक्कामी असलेले मच्छीमारी आणि बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य भटकळला परतले आणि त्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहिमेची पाहणी केली. मंत्री वैद्य यांनी बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.