तीन महिला अधिकाऱ्यांना काढले बैठकीतून बाहेर
शिष्टाचाराचे उल्लंघन; मनपा बांधकाम स्थायी समिती बैठकीतील प्रकार
बेळगाव : शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तीन महिला अधिकाऱ्यांना मनपा अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी बुधवार दि. 7 रोजीच्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत कानउघाडणी करत बाहेर काढले. त्यामुळे बैठकीला उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी धास्ती घेत बैठक पूर्ण होईपर्यंत मोबाईलवर बोलण्यासह आपापसात चर्चा करण्याचे टाळले. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत विविध बैठका आणि सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांकडून शिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिष्टाचाराचे पालन करण्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने सूचना केल्या जात आहेत. तरीदेखील त्याचे पालन होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी मनपातील स्थायी समिती सभागृहात बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीला सुरुवात झाली. अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी चर्चा करत असतानाच बांधकाम विभागाशी संबंधित तीन महिला
अधिकारी मोबाईलवर बोलण्यासह एकमेकांत चर्चा करत होत्या. त्यांच्या कुजबुजामुळे बैठकीत व्यत्यय येत असल्याने मनपाच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी त्यांना तीनवेळा शांत राहण्याची सूचना केली. तरीदेखील सूचनेकडे दुर्लक्ष करत त्या तीन महिला अधिकाऱ्यांमध्ये आपापसात चर्चा सुरूच होती. त्यामुळे संतापलेल्या अधीक्षक अभियंत्या निपाणीकर यांनी तिघींनाही फैलावर घेत शिष्टाचाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत भर बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यामुळे तिघीही महिला अधिकारी बैठकीतून निघून गेल्या. निपाणीकरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बैठकीला उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी धास्ती घेत बैठक संपेपर्यंत गप्प राहणे पसंत केले.
पर्यावरण अभियंत्यांनाही बाहेर जाण्याचा सल्ला
तीन महिला अधिकाऱ्यांना शिष्टाचाराचा उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून बाहेर काढल्यानंतर काहीवेळाने पर्यावरण अभियंता कलादगी यांनी बैठकीला हजेरी लावली. पण कलादगी यांना बैठकीदरम्यान फोन आल्याने ते मोबाईलवर बोलत होते. याची कल्पना येताच अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी कलादगी यांनाही बाहेर जाऊन बोलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कलादगी बैठकीतून उठून निघून गेले. अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी मंगळवारी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल अधिकारीवर्गात धिम्या आवाजात चर्चा सुरू होती.