For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन कुटुंबांनी केला काश्मीरचा घात

06:55 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
तीन कुटुंबांनी केला काश्मीरचा घात
Advertisement

अमित शहा यांचा घणाघात : गणेशचतुर्थीदिनी केला विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

Advertisement

वृत्तसंस्था / जम्मू

जम्मू-काश्मीरचा घात केवळ तीन राजकीय कुटुंबांनी केला आहे. या कुटुंबानी स्वत:च्या स्वार्थासाठी या प्रदेशात भ्रष्टाचार माजविला आणि आता त्यांना येथे दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालायचे आहे. तथापि, या प्रदेशातील जनता सूज्ञ असून या कुटुंबांचे सत्तेवर येण्याचे डावपेच ती यशस्वी होऊ देणार नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते जम्मू येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत भाषण करीत होते. या सभेसमवेत या पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी केला.

Advertisement

हिंदूंचा महत्त्वाचा सण असणाऱ्या श्रीगणेशचतुर्थीदिनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ होत आहे, हा एक शुभसंकेत आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यघटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ करुन या प्रदेशाच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. अनुच्छेद 370 आता पुन्हा कधीही परतणार नाही, अशी व्यवस्था झालेली आहे. आमच्या पक्षाने या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या असून त्यांच्यापैकी महत्त्वाच्या योजनांचा प्रारंभ करण्यात आला आहे. भविष्यातही या प्रदेशाचा विकास ही आमची प्राथमिकता असेल. मात्र, विरोधी पक्ष सत्तास्वार्थासाठी विकासविरोधी राजकारण करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

 

दहशतवादाचे पाठीराखे

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे पक्ष दहशतवादाचे पाठीराखे आहेत. त्यांना या प्रदेशाला पुन्हा दहशतवादच्या आगीत ढकलायचे आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची अभद्र युती पुन्हा सत्तेवर आली, तर आतापर्यंत काश्मीरचा नाश केलेली तीन कुटुंबे पुन्हा सत्तेवर येतील. तसे होऊ न देण्याचे उत्तरदायित्व जम्मू विभागावर आहे. या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यास आम्ही दहशतवादाला डोके वर काढू देणार नाही. या संकटाचा नि:पात केला जाईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

नामपरिवर्तन करण्याचा डाव

काश्मीरातील ‘शंकराचार्य टेकडी’चे नामपरिवर्तन करुन ते ‘तख्त-ई-सुलेमान’ असे करण्याची विरोधकांची कुटील योजना आहे. तसेच या प्रदेशातील गुज्जर, बकरवाल आणि पहाडी समाजांना देण्यात आलेले अधिकारही विरोधकांना काढून घ्यायचे आहेत. या समाजांना आरक्षणापासून वंचित करण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष तसे होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

फसवणूक करु नका

जम्मू-काश्मीरात सत्ता आल्यास या प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याचे काम प्रथम केले जाईल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. मात्र, हे आश्वासन म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. कारण राज्याचा दर्जा देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारचा आहे. परिणामी, गांधी यांनी जनतेची फसवणूक करण्याचे टाळावे, अशी खोचक टिप्पणी शहा यांनी केली आहे.

तीन टप्प्यांमध्ये मतदान

जम्मू-काश्मीर हा सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशात तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाचा प्रथम टप्पा 18 सप्टेंबरला, द्वितीय टप्पा 25 सप्टेंबरला तर तृतीय आणि अंतिम टप्पा 1 ऑक्टोबरला होणार आहे. 6 ऑक्टोबरला हरियाणा राज्यासह या प्रदेशाची मतगणना होणार आहे. भारतीय जनता पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस असे चार प्रमुख पक्ष या निवडणुकीत सहभागी होणार असून अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

ड प्रदेशाचा विकास घडविण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच

ड विधानसभा निवडणुकीत खरी स्पर्धा भारतीय जनता पक्ष-काँग्रेसमध्ये

ड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स अशी आघाडी

ड भारतीय जनता पक्ष काही प्रादेशिक पक्षांशी युती करुन रणमैदानात

Advertisement
Tags :

.