For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावात पावणे तीन कोटी रुपये जप्त

06:58 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावात पावणे तीन कोटी रुपये जप्त
Advertisement

गुड्स वाहनातून सांगलीहून केरळला नेताना कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सांगलीहून केरळला गुड्स वाहनातून बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेली पावणे तीन कोटी रुपये बेळगाव पोलिसांनी जप्त केले आहेत. यासंबंधी सांगली जिल्ह्यातील दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्री पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भाजी मार्केटजवळ ही कारवाई केली आहे.

सचिन मेनकुदळे (वय 32 रा. ढालगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), मारुती मारगुडे (वय 25 रा. करगणी ता. आटपाडी, जि. सांगली) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा जणांची नावे आहेत. अशोक लेलँड कंपनीच्या दोस्त या गुड्स वाहनात बदल करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड केरळला नेण्यात येत होते.

यासंबंधीची माहिती मिळताच महामार्गावर गुड्स वाहन अडवून पोलिसांनी तपासणी केली. मात्र सुरुवातीला रक्कम मिळाली नाही. मेकॅनिकच्या मदतीने पोलिसांनी तपासणी केली असता वाहतुकीसाठी गुड्स वाहनात तयार करण्यात आलेल्या कप्यात 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपये रोकड आढळून आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रक्कम वाहतुकीसाठी गुड्स वाहनाच्या केबीनमध्ये चोर कप्पा तयार करण्यात आला होता. पोलिसांनी वाहनासह रक्कम जप्त केली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गुड्स वाहनातून नेण्यात येत असलेली ही रक्कम कोणाची? ती कुठे पोहोचविण्यात येत होती, यासंबंधीची माहिती मिळविण्यात येत आहे. पोलिसांनी सांगलीहून हुबळीकडे नेण्यात येत असल्याचे सांगितले असले तरी ती रक्कम केरळला पोहोचविण्यात येत असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.