दुचाकीच्या धडकेत तिघे बांधकाम मजूर जखमी
कोल्हापूर
पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील दत्त मंदिरसमोर दुचाकीच्या धडकेत तिघे बांधकाम मजूर जखमी झाले. मायाप्पा हणमंता अलकुंटे ( वय 50) रामाप्पा भीमाप्पा गाडीवडर (वय 60, दोघेही रा. शिवनेरी कॉलनी, इंदिरानगर, नागाव, ता. हातकणंगले) व तुकाराम सिद्धाप्पा जनगेकर (वय 42, रा. यादववाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या घडली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, पुलाची शिरोली येथील बिरदेव मंदिराच्या समोरील एका क्रीडा मंडळाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम आटोपून तुकाराम जनगेकर व त्याचा सहकारी घरी निघाले होते. दत्त मंदिर येथे महामार्ग ओलांडत असताना मायाप्पा अलकुंटे याच्या दुचाकीने जनगेकर यांना धडक दिली. या धडकेत तुकाराम जनगेकर यांच्यासह दुचाकीवरील मायाप्पा अलकुंटे व रामाप्पा गाडीवडर असे तिघे जखमी झाले. तिथे जमलेल्यापैकी एकाने 108 क्रमांकवर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. या रुग्णवाहिकेतून जखमींना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची नोंद कोल्हापूर येथील सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी आलेली नव्हती.