मोक्कातील गुंड सूर्यवंशीसह सहा साथीदारांना अटक
कोल्हापूर :
मोक्याच्या गुह्यात कारागृहाची हवा खाऊन, जामीनावर कारागृहातून बाहेर आलेल्या अनिकेत अमर सुर्यवंशी (वय 23, रा. केव्हीज पार्क, नागाळा पार्क, कोल्हापूर) या पोलीस रेकॉर्डवरील गुंडाची त्याच्या साथिदारांनी कळंबा कारागृह ते कोल्हापूरातील नागाळा पार्क येथील राहत्या घरापर्यत दुचाकी व कारची रॅली काढली. या रॅलीचा रील्स बनवून, या गुंडाच्या टोळीची दहशत माजविण्याच्या उद्देशाने, रॅलीचा रील्स समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. याची माहिती शाहुपूरी पोलिसांना समजताच कारागृहातून जामीनावर आलेल्या गुंड अनिकेत सुर्यवंशीसह त्याचा सात साथिदारांना अटक केली. तसेच रॅलीतील दुचाकी व चारचाकी गाडीसुध्दा जप्त केली आहे, अशी माहिती शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
अटक केलेल्यांमध्ये गुंड अनिकेत अमर सुर्यवंशी, त्याचे साथिदार गब्बर उर्फ आदित्य अमर सुर्यवंशी (वय 25, रा. केव्हीज पार्क, नागाळा पार्क, कोल्हापूर), अनुराग दिलीप राखपसारे (वय 20, रा. सदर बाजार, कोल्हापूर), सागर कैलास गौडदाब (वय 34, रा. गणेश पार्क, कदमवाडी, कोल्हापूर), प्रथमेश कुमार समुद्रे (वय 20, रा. सदर बाजार, कोल्हापूर), वेदांग शिवराज पोवार (वय 30, रा. बिंदू चौक, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. अन्य तीन ते चार अनोळखी तरुणांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्या अनोळखी तऊणांचा पोलीस शोध घेत आहेत.
गुंड अनिकेत सुर्यवंशीसह त्याच्या साथिदाराविरोधी कारवाई करण्यात आली होती. या गुह्यात त्याला आणि त्याच्या साथिदारांना अटक कऊन, त्या सर्वची रवानगी कळंबा कारागृहात केली होती. तो आणि त्याचे साथिदार अनेक महिने कळंबा कारागृहातची हवा खात होता. 24 डिसेंबर,2024 रोजी तो कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. तर त्याचा साथीदार पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार गब्बर उर्फ आदित्य सुर्यवंशी हा त्याच्या पूर्वी कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. गुंड अनिकेत कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी कारागृहाच्या बाहेर त्याचे साथिदार व समर्थक मोठ्या संख्येने दुचाकी व चारचाकी गाडी घेऊन थांबले होते. तो कारागृहातून बाहेर येताच, त्याला खांद्यावर घेत, चारचाकी गाडीमध्ये बसवून, कळंबा कारागृह ते तो राहत असलेल्या कोल्हापूरातील नागाळा पार्क येथील घरापर्यत त्याच्या साथिदारांनी आणि समर्थकांनी घोषणाबाजी करीत, रॅली काढली होती.
रॅलीचा रील्स 6 जानेवारी रोजी समाज माध्यमावर आर. एस. कंपनी 125 इस्ट्राग्राम अकौंटवरून प्रसारीत केला. हा रिल्स शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोके यांच्या पाहण्यात आला. त्यांनी याबाबत उपनिरीक्षक संदीप जाधव, मिलींब बांगर, महेश पाटील, विकास चौगले, रवी आंबेकर, सनिराज पाटील, बाबा ढाकणे, सुशिल गायकवाड यांच्या पोलीस पथकाला गुंड अनिकेत आणि त्याच्या साथिदाराविरोधी कारवाई करण्याबातचा आदेश दिला. त्यानुसार या पथकाने गुंड अनिकेतसह त्याच्या सात साथिदारांचा शोध घेवून, त्याना अटक केली. त्याचबरोबर त्यानी रॅलीत वापरलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाडी जप्त केली.