कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेलेली तीन मुले बुडाली
एकाचा मृतदेह सापडला : दोघांचे शोधकार्य सुरू
वार्ताहर/विजापूर
आलमट्टी जलाशयाच्या पुढील भागात कृष्णा नदीच्या पात्रात गुढीपाडव्या दिवशी (रविवारी) आंघोळीसाठी गेलेली तीन मुले वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचे शोधकार्य सुरू आहे. हे तिघेही बागलकोट तालुक्यातील इल्याळ गावातील आहेत. सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय 15) याचा मृतदेह सापडला आहे, तर मल्लप्पा बसप्पा बगली (वय 15), परनगौडा मल्लप्पा बिळगी (वय 17) यांचे कृष्णा नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच बागलकोट अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मच्छीमारांच्या सहकार्याने बुडालेल्यांचे शोधकार्य सुरू आहे. यादरम्यान एकाचा मृतदेह सापडला आहे. बागलकोट तालुक्यातील सितीमनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून घटनास्थळी बागलकोट सीपीआय एच. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.