For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कूनोमध्ये चित्त्याच्या तीन पिल्लांचा जन्म

06:43 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कूनोमध्ये चित्त्याच्या तीन पिल्लांचा जन्म
Advertisement

वृत्तसंस्था/ कूनो

Advertisement

मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामीबियन चित्ता ज्वालाने तीन नव्या पिल्लांना जन्म दिला आहे. चित्ता प्रकल्पासाठी ही आनंददायी घटना ठरली आहे. यापूर्वी 3 जानेवारी रोजी आशा या मादी चित्त्याने तीन पिल्लांना जन्म दिला होता. आता कूनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 6 नव्या चित्त्यांची भर पडली आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.  ‘कूनो मधील नवे प्राणी, ज्वाला नावाच्या नामीबियन चित्त्याने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. नामीबियन चित्ता आशाकडून स्वत:च्या पिल्लांना जन्म देण्यात आल्याच्या काही आठवड्यांमध्येच ही शुभघटना घडली आहे. देशभरातील सर्व वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा. भारतात अशाचप्रकारे वन्यजीव बहरावे असे यादव यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Advertisement

मागील वर्षी 27 मार्च रोजी देखील ज्वालाने चार पिल्लांना जन्म दिला होता, परंतु यातील तीन पिल्लांचा मृत्यू झाला होता. एक मादी पिल्लू पूर्णपणे तंदुरुस्त असून ती आता 10 महिन्यांची झाली आहे.

कूनोमध्ये नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून दोन टप्प्यांमध्ये एकूण 20 चित्ते आणले गेले होते. यातील 7 चित्त्यांचा मृत्यू झाला होता. आता पिल्लांची संख्या कुनोमध्ये 7 झाली आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या चित्ता प्रकल्पाला आता यश मिळू लागले आहे. स्वतंत्र भारतात विलुप्त झालेली एकमात्र मोठ्या मांसाहारी प्रजातीत वृद्धी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

Advertisement
Tags :

.