वेर्णा ‘हाय-वे रॉबरी’प्रकरणी तिघांना अटक, एकटा फरारी
मडगाव : वेर्णा येथील जीम जॅम सुपोर्णिका बार अॅड रेस्टॉरंटच्या मालकावर भल्या पहाटे हल्ला करुन त्यांच्याकडील ऐवज लुटल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी चारजणांना अटक केली असून एक आरोपी फरारी आहे. व्यवसायिक स्पर्धेतून हा जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी काल सोमवारी सायंकाळी उशिरा मडगावच्या पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रेल्वे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, वेर्णा पोलिसस्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो व अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बनावट नंबरप्लेटची कार जप्त
या हल्ल्यासंबंधी पोलिसांनी हल्लेखोरांकडून बनावट नंबरप्लेट लावलेली कार जप्त केली आहे. ही कार धारबांदोडा येथे सोडून दिलेल्या अवस्थेत होती. या कारमध्ये बनावट नंबर प्लेट, 5 मंकी कॅप्स, लोखंडी सळ्या, बेसबॉल बॅट व लोखंडी लिव्हर जप्त करण्यात आले आहे.
विजयन यांच्यावर जीवघेणा हल्ला
या रेस्टॉरंटचा मालक विजयन भल्या पहाटे आपल्या कारमधून जात असताना दुसऱ्या एका कारने त्यांना ओव्हरटेक केले आणि ती कार आडवी घालून विजयन चालवत असलेल्या कारला अडविले. त्यानंतर कारमधील विजयन यांच्यावर लोखंडी सळीने हल्ला करण्यात आला. कारची तोडफोड करण्यात आली. विजयन यांचा उजवा हात मोडला, उजव्या पायालाही जखम करण्यात आली तसेच डोक्यावरही लोख्ंडी सळीने प्रहार करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी विजयन यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरली, मोबाईलही लंपास केला तसेच 10 हजार रुपयेही पळविले.
पोलिसांना मिळाला एक धागा
पोलिसानी प्राथमिक चौकशी केली तेव्हा पोलिसांना कोणताही धागा तक्रारदार देऊ शकला नाही. मात्र धंद्यातील दुश्मनीतून हा हल्ला होऊ शकतो, असा एक पुसटसा धागा पोलिसाना दिला होता, त्याच धाग्यावरुन पोलिसानी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास लावला.
हाय-वे रॉबरी प्रकरण
हाय-वे रॉबरी अशी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन घेतली आहे. पोलिसांनी तपास हाती घेतला. अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 3 पोलिस पथके तयार करण्यात आली. वास्कोचे पोलिस उपअधीक्षक तसेच वास्को पोलिस विभागाकडे संलग्न असलेले वेर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो, वास्को रेल्वे पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर, उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, यशवंत रायकर, नितीन देसाई, राजदत्त आर्सेकर, महेश भोमकर, सुधीर तळवणेकर, गिरीश नाईक, अजीत शिरोडकर, शिवा नाईक, जगदीप धोत्रेकर, सतिश लाखाडे, गणेश कुर्टीकर, आत्माराम पोळे, परेश गावडे यांचा या तीन पथकात सहभाग होता.
साकवाळच्या संशयिताला अटक
शिंपालवाडा - साकवाळ येथील रेस्टॉरंट चालक सच्चित विश्वनाथ नाईक या व्यावसायिकाला पोलिसानी ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली तेव्हा उघड झाले की विजयन हा सच्चित विश्वनाथ नाईक यांच्याकडे कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याने त्यांच्याकडील नोकरी सोडली होती आणि स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले होते. सच्चित विश्वनाथ नाईक हे या प्रकरणी कोणताच धागा देण्यास तयार नव्हते. मात्र अखेर त्यांनी एक धागा दिला. बोरी येथील गोकुळदास नाईक हे त्यांचे मित्र होते. त्यांचे नाव पोलिसांना सांगितल्यानंतर गोकुळदास नाईक यांना ताब्यात घेण्यात आले. अखेर गोकुळदास यानीही आपले तोंड उघडले आणि हा गुन्हा आपणच केला असल्याची कबुली दिली.
शिरोडा येथील संशयित आरोपी मंदार श्रीधर प्रभू याच्या साहाय्याने हा गुन्हा केलेला असल्याची कबुली गोकुळदासने दिली. पोलिसांनी आतापर्यंत सच्चित विश्वनाथ नाईक, गोकुळदास नाईक व मंदार श्रीधर प्रभू यांना अटक केली होती. या प्रकरणात आणखी एक आरोपी असून सध्या पोलिस त्याच्या मागावर आहेत अशी माहिती सुनिता सावंत यांनी दिली. सच्चित व गोकुळदास यांनी हा कट रचला होता आणि हा कट गोकुळदास, मंदार आणि फरारी आरोपीने प्रत्यक्षात आणलेला होता. अटक केलेल्या वरील तिन्ही आरोपींना आणखी 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.