रेशन तांदूळ विक्रीप्रकरणी तिघांना अटक
हलसंगी क्रॉस येथे कारवाई : तीन टन तांदूळ जप्त
वार्ताहर/विजापूर
विजापूर जिह्यातील चडचण तालुक्यातील हलसंगी क्रॉस येथे अन्नधान्याच्या वितरणासाठी राखीव असलेल्या तीन टन तांदळाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना स्थानिक पोलिसांनी अटक केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. जप्त करण्यात आलेला तांदूळ बाजारभावानुसार सुमारे 87,000 रुपयांचा आहे. मुस्ताक शेख, रसूल मोमिन, दावलशाब शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर तिघेजण पिकअप वाहनाद्वारे तांदळाची बेकायदा वाहतूक करत होते. याची माहिती झळकी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हलसंगी क्रॉस येथे सापळा रचला होता. सदर वाहन येताच त्याची तपासणी केली असता त्यात तीन टन तांदूळ सापडले. अधिकाऱ्यांनी तात्काळ तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा तांदळाची होणारी वाहतूक व विक्री थांबावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अशाप्रकारची होणारी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.