साडेतीन हजार फायली...दोन दिवसांत निकाली!
मनपा आयुक्त शुभा बी. यांचा कौतुकास्पद धडाका : सुटी दिवशीही अधिकाऱ्यांना लावले रात्री उशिरापर्यंत कामाला
बेळगाव : ई-आस्थीसाठी प्रलंबित असलेल्या सुमारे 3 हजार 565 फायली महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी शनिवार आणि रविवारी स्वत: आपल्या कक्षात बसून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निकाली काढल्या आहेत. सुटीच्या दिवशीदेखील अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्या लॉगईनमध्ये अडकलेल्या फायलींना मंजुरी दिली. केवळ टेक्निकल ईररमुळे झोनल आयुक्तांकडून अखेरची मंजुरी मिळणे बाकी असून येत्या दोन दिवसांत संबंधित मिळकतधारकांना ए व बी खात्यांचे वितरण केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील मिळकतींना पूर्वीपासून ए खाता दिला जात आहे. मात्र, अलीकडेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार अनधिकृत मिळकतींची उपनोंदणी कार्यालयात नोंद असल्यास त्यांना बी खाता दिला जात आहे. या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत आहे. सुरुवातीला कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शहरातील सर्व 58 प्रभागांसाठी अर्ज स्वीकारले जात होते. त्याच ठिकाणी बिलकलेक्टर, महसूल निरीक्षक व संगणक संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.
उद्घाटन कार्यक्रमावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मिळकतधारकांना ए व बी खात्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर अशोकनगर, कोनवाळ गल्ली, गोवावेस येथील विभागीय कार्यालयांमध्ये ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली. मात्र, या विभागीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मिळकतधारक किंवा नगरसेवक एखादी फाईल घेऊन गेल्यास त्यामध्ये त्रुटी सांगून फाईल माघारी धाडल्या जात होत्या. मात्र, सदर फाईल एखाद्या एजंटाच्या माध्यमातून दिल्यास त्यांना तातडीने मंजुरी देण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्वत: मनपा आयुक्त शुभा बी. यांनी विभागीय कार्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी केल्यानंतर खरा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी अशोकनगर आणि कोनवाळ गल्ली या विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारणे बंद करून मनपाच्या मुख्य कार्यालयात एक खिडकी सुरू केली आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या फायलींची नोंद करून घेऊन पुढे कार्यवाहीसाठी पाठविल्या जात आहेत.
बिलकलेक्टरना क्रिएटर म्हणून आयडी देण्यात आली आहे तर महसूल निरीक्षक व महसूल अधिकाऱ्यांना दुसरी आयडी देण्यात आली आहे. 2400 चौरस मीटर मिळकतींना मंजुरी देण्याचा अधिकार झोनल आयुक्तांना आहे. तर यापेक्षा जास्त मिळकती असल्यास त्यांना मंजुरी देण्याचा अधिकार महसूल उपायुक्तांना आहे. सर्व प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तरीदेखील अधिकारी फायली निकालात काढण्यास विलंब लावत आहेत, अशी ओरड कायम आहे. त्यामुळे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी शनिवारी सकाळी सर्व महसूल अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले. रात्री 9 पर्यंत एका दिवसात पंधराशेहून अधिक ई-आस्थींच्या फायली निकाली काढल्या. त्यानंतर रविवारी सकाळीदेखील अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन सायंकाळपर्यंत प्रलंबित फायली त्यांच्या लॉगईनमधून मार्गी लावल्या. दोन दिवसांत 3 हजार 565 फायली निकालात काढण्यात आल्याने मनपा आयुक्तांच्या या धडाक्याचे कौतुक होत आहे. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी या कार्यवाहीची धास्ती घेतली आहे.
झोनल आयुक्तांकडून अखेरची मंजुरी मिळणे बाकी
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ई-आस्थीसंबंधी प्रलंबित असलेल्या साडेतीन हजाराहून अधिक फायलींना मंजुरी देण्यात आली आहे. टेक्निकल समस्या असल्याने झोनल आयुक्तांकडून अखेरची मंजुरी मिळणे बाकी आहे. सर्व समस्या दूर झाल्यास मिळकतधारकांना ए व बी खाते दिले जाईल.
- मनपा आयुक्त शुभा बी.
