For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आलमट्टीतून साडेतीन लाख क्युसेकने विसर्ग

11:07 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आलमट्टीतून साडेतीन लाख क्युसेकने विसर्ग
Advertisement

पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ : धरणातून विसर्ग : नद्यांच्या पातळीत किंचित घट

Advertisement

वार्ताहर /एकसंबा

पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत किंचित स्वरूपात वाढ होत आहे. आलमट्टी धरणात देखील पाण्याची आवक वाढत असल्याने साडेतीन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या आलमट्टी धरण 54 टक्के भरले आहे. गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने आलमट्टी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे पाणी संथ ओसरत आहे. अन्यथा पाणीपातळी वाढण्याची शक्यता होती.

Advertisement

पाणलोट क्षेत्रात पुढील आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पावसाचे प्रमाण संततधार असणार आहे. सध्या कोयना धरणात 45 हजार 168 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर 42 हजार 100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तसेच वारणा धरणातून 11 हजार 585 क्युसेक, राधानगरी धरणातून 5 हजार 785 क्युसेक, काळम्मावाडी धरणातून 9100 क्युसेक, कण्हेर धरणातून 4681 क्युसेक, धोम धरणातून 3856 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

बुधवारी राजापूर बंधाऱ्यातून 3475 क्युसेक पाण्याचा प्रवाह घटून 2 लाख 43 हजार 589 क्युसेक इतके पाणी येत होते. तर दूधगंगा नदीतून 1760 क्युसेकने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह घटला असून 45 हजार 50 क्युसेक इतके पाणी येत होते. तर कल्लोळ कृष्णा नदीत 5235 क्युसेक पाण्याचा प्रवाह घटला असून 2 लाख 88 हजार 649 क्युसेक पाण्याचा प्रवाह अद्यापही येत आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 536.50 मीटर असून 0.09 मीटरने पाणी कमी झाले आहे. तर दूधगंगा नदीची पाणीपातळी 537.440 मीटर असून 0.13 मीटर इतकी पाणीपातळी कमी झाली आहे.

पावसाचे प्रमाण पाहता कोयना पाणलोट क्षेत्रात 74 मि.मी., वारणा 85 मि.मी., काळम्मावाडी 71 मि.मी., राधानगरी 120 मि.मी., पाटगाव 110 मि.मी., महाबळेश्वर 62 मि.मी., नवजा 104 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी तालुक्यातील पावसाचे प्रमाण पाहता चिकोडी विभाग 7.2 मि.मी., अंकली विभाग 3.2 मि.मी., नागरमुन्नोळी विभाग 3.2 मि.मी., सदलगा विभाग 8 मि.मी., जोडट्टी विभाग 0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आलमट्टी धरणात 515.38 मीटर पाणीपातळी असून 66.70 टीएमसी पाणीसाठा आहे तर 54 टक्के धरण भरले आहे. 3 लाख 41 हजार 384 लाख क्युसेक पाण्याची आवक होत असून 3 लाख 50 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणातील पाणीसाठा पाहता कोयना धरणात 85.82 टीएमसी पाणीसाठा असून 82 टक्के पाणी आहे. धोम धरणात 11.49 टीएमसी पाणीसाठा असून 85 टक्के धरण भरले आहे. कण्हेर धरणात 7.85 टीएमसी पाणीसाठा असून 78 टक्के धरण भरले आहे. वारणा धरणात 29.60 टीएमसी पाणीसाठा असून 86 टक्के धरण भरले आहे. काळम्मावाडी धरणात 22.18 टीएमसी पाणीसाठा असून 87 टक्के धरण भरले आहे. राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा असून 100 टक्के धरण भरले आहे. पाटगाव प्रकल्पात 3.72 टीएमसी पाणीसाठा असून 100 टक्के प्रकल्प भरला आहे.

हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत 1 फुटाने वाढ 

गत चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली. कोकण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने हिरण्यकेशी, घटप्रभा या नद्यांच्या पाणीपातळीत गुरुवारी एक फुटाने वाढ झाली आहे. पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने नदीकाठ भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांसह जलाशय, तलाव 100 टक्के भरले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराची स्थिती निर्माण झाली होती. गत चार दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने नद्यांच्या पाणीपातळीत किंचित घट झाली. त्यामुळे पुराचा धोका टळला होता. मात्र गुरुवारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.