सीरियात अमेरिकेचे 3 सैनिक ठार
इस्लामिक स्टेटचा हल्ला : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा
वृत्तसंस्था/ दमास्कस
सीरियात झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले आहेत. या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तरादाखल हल्ल्याची शपथ घेतली आहे. सीरियातील हल्ला इस्लामिक स्टेटने घडवून आणल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. सीरियाचे अध्यक्ष अहमद अल शारा देखील या हल्ल्यामुळे अत्यंत त्रस्त असून भडकले आहेत असे ट्रम्प यांचे सांगणे आहे.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सैनिक हे नॅशनल गार्डचे सदस्य होते. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार सुरू आहेत. सीरियात झालेला हल्ला दहशतवाद्याने केला होता आणि प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत तो मारला गेल्याचे यूसए सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आले.
या हल्ल्याला अत्यंत गांभीर्याने घेण्यात आले असल्याचे ट्रम्प यांनी सोशल म्हटले आहे. सीरियात बशर अल असाद सरकारचे पतन झाल्यावर तेथे अमेरिकेच्या सैनिकांवर अशाप्रकारचा पहिल्यांदाच हल्ला झाला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेत सामील सैनिकांवर हा हल्ला करण्यात आल्याचे पेंटागॉनच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
इस्लामिक स्टेट विरोधात लढण्यासाठी अमेरिकेने पूर्व सीरियामध्ये सैन्य तैनात केले आहे. असाद सरकारच्या काळात अमेरिकेने सीरियासोबतचे राजनयिक संबंध संपुष्टात आणले होते. सीरियात सत्तापालट झाल्यावर अमेरिकेने पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित केले आहेत. मागील महिन्यातच सीरियाचे अध्यक्ष अल शारा यांनी अमेरिकेचा दौराही केला होता.