राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धमक्या
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना याच राज्याच्या दौसा कारागृहातून धमक्या देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्यात येईल, अशी धमकी राजस्थानातील दौसा येथील कारगृहातून देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी हा प्रकार घडला. ही धमकी जयपूर पोलिस नियंत्रण कक्षातील एका दूरध्वनीवर देण्यात आली होती.
पोलिसांनी या दूरध्वनी संदेशाचा माग काढला असता तो दौसा येथील कारागृहातून आल्याचे समजले. यानंतर दौसा मध्यवर्ती कारागृहाची पूर्णपणे तपासणी करण्यात आली. या कारागृहातील एका कैद्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. मूळच्या दार्जिलिंग येथील एका कैद्याने हा दूरध्वनी केला असल्याची शक्यता असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
कारागृहात मोबाईल कसा
कारागृहात मोबाईल बाळगण्यास बंदी असूनही येथे मोबाईल कसा आला, याची आता चौकशी केली जात आहे. तसेच या कैद्याला तो कोठून मिळाला असाही प्रश्न असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे काय, हे देखील तपासले जाणार आहे. दहशतवादी संघटनांनी हे कृत्य सदर कैद्याकडून घेतले असण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे. त्या दिशेनेही तपास होत आहे.
कैद्याचे नाव नेमो
धमकी देणाऱ्या कैद्याचे नाव नेमो असे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे कारागृह 2018 मध्ये निर्माण करण्यात आले होते. येथे केवळ खून आणि बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांच्या आरोपींना ठेवण्यात येते. भजनलाल शर्मा यांना कारागृहातून धमकी येण्याची ही पहिली वेळ नसून त्यांना जयपूर कारागृहातूनही अशीच धमकी मिळाली होती. त्यामुळे कारागृह व्यवस्थापनात सुधारणा केली जाणार आहे.