For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्ज तस्करीत गोवण्याची धमकी

11:19 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्ज तस्करीत गोवण्याची धमकी
Advertisement

सायबर गुन्हेगारांकडून प्रतिष्ठितांना लुटण्याचा नवा फंडा : सहाहून अधिक जणांना फोन कॉल

Advertisement

बेळगाव : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नेहमी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. कधी एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे म्हणून बँक खात्यातील रक्कम गायब करतात तर आणखी कधी तुम्हाला लॉटरी लागली आहे, असे सांगून सावजाला फशी पाडतात. आता फसवणुकीसाठी नवा प्रकार सुरू झाला असून बेळगाव परिसरातील उद्योजक व प्रतिष्ठितांना ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचे सांगून त्यांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात बेळगाव परिसरातील अर्धा डझनहून अधिक प्रतिष्ठितांना सायबर गुन्हेगारांकडून धमक्यांचे फोन कॉल आले आहेत. प्रतिष्ठित उद्योजक, डॉक्टर, राजकीय नेत्यांचे पत्ते गुगलवर सहजपणे उपलब्ध होतात. या पत्त्यांचा वापर करून सायबर गुन्हेगार मोठा खेळ करीत आहेत. त्यामुळे उद्योजक, अधिकारी, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती हैराण झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी नवा फंडा शोधून काढला आहे. एखाद्या उद्योजकाशी संपर्क साधून तुम्हाला ड्रग्ज केसमध्ये अडकवतो. नाही तर प्रकरण मिटवून घ्या, असे सांगत मोठी रक्कम मागितली जात आहे. अनेक जण या गुन्हेगारांच्या कारवायांमुळे पुरते हैराण झाले आहेत. अनेकांनी मदतीसाठी सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली आहे.

हे पार्सल कोणाकडून आले?

Advertisement

आम्ही विमानतळावरून बोलत आहोत. तुमच्या नावे एक पार्सल आले आहे. या पार्सलमध्ये एमडीएम किंवा इतर अंमलीपदार्थ आहेत. हे पार्सल कोणाकडून मागविला किंवा कोणाला पाठवत आहात? अशी विचारणा केली जाते. अचानक ड्रग्जचे पार्सल आल्याचे ऐकून समोरच्या व्यक्तीला धक्काच बसतो. सुरुवातीला आम्ही अशा भानगडीत पडणारे नाही, असे सांगून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हेगार मात्र सावजाची पिच्छा पुरवतच असतात. आम्ही देशातील राजधानीतील एनडीपीएस विभागाकडून बोलत आहोत. अंमलीपदार्थांच्या व्यवसायात तुमचा सहभाग आहे. ड्रग्ज कोठून मागवता? यासंबंधीची माहिती द्या. नहून स्थानिक सायबर क्राईम विभागाला सांगून तुम्हाला अटक केली जाईल, असे धमकावण्यात येते. आम्ही अशाप्रकारची माणसे नाहीत, असे वारंवार सांगूनही सायबर गुन्हेगार ऐकत नाहीत.

शेवटी अडचणीत यायचे नसेल तर आम्ही सांगतो तसे करा आणि प्रकरण मिटवून टाका, असा सल्ला दिला जातो. गेल्या आठ दिवसांत बेळगाव येथील एक हॉटेल व्यावसायिक, खासगी कंपनीतील व्यवस्थापक व उद्योजकासह सहाहून अधिक जणांना सायबर गुन्हेगारांच्या धमकीचे फोन कॉल आले आहेत. अचानक ड्रग्जच्या प्रकरणात अडकवणार, अशा धमक्या मिळाल्यामुळे धक्का बसलेल्या अनेकांनी आपल्या परिचित पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. यापैकी काही जणांनी सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे. मात्र, एकानेही अद्याप गुन्हेगारांच्या बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत. त्यामुळे कोणीही अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. अशा वाढत्या प्रकारांमुळे उद्योजक, अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सतर्क रहा, संपर्क साधा!

यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर यांच्याशी संपर्क साधला असता विमानतळावर आढळलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, असे सांगून प्रतिष्ठितांना लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. आपल्याकडेही अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांना घाबरून स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नये. असे प्रकार नव्यानेच सुरू झाले असून धमक्यांचे जर फोन कॉल आले तर लगेच यासंबंधी सायबर क्राईम विभागाला माहिती द्यावी. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.