परिश्रांनी फुलवलेली हजारो झाडे खाक
नववर्षाच्या बेधुंद आतशबाजीने लागली आग : जुनसवाडा - मांद्रे येथील डोंगरावरील घटना, डोंगर हडपण्यासाठी आग लावल्याचा संशय
मोरजी : गोव्यात रात्री 10 नंतर दाऊकामाच्या आतषबाजीवर कडक निर्बंध असले तरी मंगळवारी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मांद्रे समुद्रकिनारी भागात लाखो ऊपयांचा चुराडा करून दाऊकामाची आतषबाजी चालू होती. या आतषबाजीच्या आगीत जुनसवाडा-मांद्रे येथील डोंगराला आग लागली आणि त्यात पर्यावरणप्रेमींनी गेल्या 10 वर्षांपासून अथक प्रयत्नांतून जगवलेल्या 5000 झाडांपैकी तब्बल 3 हजारांहून अधिक झाडे या आगीत जळून खाक झाली. काजू बागायतही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. डोंगर हडप करण्यासाठी ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दलाचे जवान बंब घेऊन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी पुढाकार घेऊन आग विझवण्यात यश मिळवले. किनारी भागातील आतशबाजीची ठिणगी पडल्याने अल्पावधीत या डोंगराने पेट घेतला आणि हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दारुकामाची आतशबाजी करताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा अनर्थ घडला.
मोठ्या कष्टाने वाढवलेली झाडे
पर्यावरणप्रेमींनी मागच्या 10 वर्षांत लावलेली आणि मोठ्या कष्टांनी जगवलेली हजारो झाडे या आगीत खाक झाली आहेत. नियंत्रण नसलेल्या जल्लोषामुळे या झाडांचा बळी गेला आहे. ही आग विझवण्यासाठी स्थानिक युवक-युवतीनी मिळेल तिथून बाटल्या, प्लास्टिक भांड्यामधून पाणी घेऊन माळरानावर धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
युवक-युवतींनी विझविली आग
पर्यावरणप्रेमी असलेल्या युवकांनी ही झाडे लावली होती. काल आगीची घटना घडताच अनेक युवकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात रविराज पेडणेकर, प्रवीण म्हामल, सुरेन म्हामल, देवता म्हामल, प्राची म्हामल, उद्देश पेडणेकर, आकार दाभाळे आदी युवकांनी डोंगराकडे धाव घेतली. आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा अहोरात्र प्रयत्न केला म्हणून आग विझली. मात्र पर्यावरणप्रेमींनी लावलेली झाडे वाचवता आली नाही. सुमारे तीन हजार झाडे जळून खाक झाली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध करताना दु:खही व्यक्त केले.
धवरुख संस्थेच्या प्रयत्नांवर फेरले पाणी
मांद्रे येथील धवऊख संस्थेतर्फे या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून झाडे लावली जात आहेत. त्याचबरोबर लावलेली झाडे जगवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी धवऊख संस्थेचे रूद्रेश म्हामल यांनी पुढाकार घेतला आहे. विद्या प्रबोधिनी संस्थेचे विद्यार्थी दर रविवारी या ठिकाणी येऊन या झाडांना उन्हाळ्यात पाणी देतात. त्यासाठी रस्त्यावरून डोंगरावर पाणी नेले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांची फौज बरीच मेहन घेत असते. त्यांच्या या साऱ्या प्रयत्नांवर या आतशबाजी पाणी फेरले आहे.
डोंगर हडप करण्यासाठी आग मुद्दाम लावल्याचा दावा
गेल्या काही वर्षांमागे या ठिकाणी आग लागण्याची घटना घडली होती. आताची ही आगही मुद्दाम लावल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कोणीतरी हा डोंगर हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही काहीजणांकडून केला जात आहे. मात्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. काल बुधवारी लागलेली आग विझवण्यासाठी धवऊख संस्थेचे कार्यकर्ते वावरत होते. त्यात अॅड. प्रसाद शहापुरकर, त्यांचा मुलगा, ऊद्रेश म्हामल, गोवेकर यांचाही समावेश होता.
मांद्रेसाठी स्वंतत्र अग्निशमन दलाची गरज
पेडणे तालुक्यात एखाद्या पंचायत क्षेत्रात आगीची घटना घडली की पेडणे अग्निशामक दलास पाचारण केले जाते. मात्र किमान एक दीड तासांच्या प्रवासानंतर बंब पोचतो खरा, मात्र तेंपर्यंत काहीच शिल्लक राहिलेले नसते, हा अनुभव आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघासाठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र मिळण्याची आवश्यकता आहे. आमदार जीत आरोलकर यांनी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.