भाजप इच्छुकांचे ‘बाशिंग गुडघ्यावरच’!
भाजप संघटन निवडणुकीत पडद्यामागून नाराजीनाट्या : यावर्षी सुरु केलेल्या वयोमर्यादेमुळे अनेकांचा हिरमोड
जय नाईक/पणजी
भाजपच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला वेग आला असला तरी पडद्यामागून नाराजी नाट्याही सुरू झाल्याचे वृत्त आहे. भरीस यंदा मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आल्यामुळे अनेक ‘इच्छुकांचे बाशिंग गुडघ्यावरच’ राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच हे नाराजीनाट्या सुरू झाले असून ‘हेची फळ काय मम तपाला?’, अशी त्यांची भावना झाली आहे.
जे. पी. नड्डांकडून गोव्याची स्तुती
या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असलेल्या बूथ समित्यांची जवळजवळ 90 टक्के निवड पूर्ण झाली आहे. या तत्पर कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्याची स्तुतीसुद्धा केली आहे. आता पुढील टप्प्यात मंडळ समिती, जिल्हा कार्यकारिणी, महिला अध्यक्ष, युवा मोर्चा यांच्या विविध विभागांचे अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. शेवटी प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस येणार
यापैकी मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रिया उद्या आणि परवा म्हणजे दि. 5 आणि 6 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर दोन्ही जिल्हा अध्यक्षांची निवड 10 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून त्याच मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचेही उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तरीही काही कारणांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडलीच तरी कोणत्याही परिस्थितीत दि. 20 ते 25 जानेवारी पर्यंत पूर्ण होणार आहे. या निवडणुकीवेळी सरचिटणीस सुनिल बन्सल हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.
...तरीही ‘अंडर करंट’ वेगळाच
भाजपने हल्लीच मार्गी लावलेल्या मोहिमेतून तब्बल 4 लाख सदस्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरीही ‘अंडर करंट’ वेगळाच असल्याचे ऐकू येत आहे. पक्षासाठी वर्षांनुवर्षे निष्ठेने वावरणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यापैकी काहींच्या मनात ‘किमान मंडळ अध्यक्षासारखे एखादे छोटेसे पद तरी मिळावे’ अशी सुप्त मनिषा आहेच.
नाराजीनाट्या कधीपर्यंत चालणार
ही निवडणूक हा पक्षाचा मामला असला तरीही नाही म्हटले तरी अनेकदा त्यात राजकीय हस्तक्षेप हा होतच असतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. त्यातून शेवटच्या क्षणी भलताच कुणीतरी नवागत त्या पदावर बसतो व इच्छुकांचा अपेक्षाभंग, हिरमोड होतो. भाजपमध्ये सुरू असलेले नाराजीनाट्या हा त्याचाच परिपाक असल्याचे वृत्त आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला असला तरीही लोकसभा निवडणूक तसेच महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता शक्यतो येत्या 25 जानेवारीपर्यंत पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार हे निश्चित झाले आहे.
नवे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र सावईकर की दामू नाईक
अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यात किमान पाच जणांमध्ये चुरस आहे. त्यापैकी तब्बल पाच वेळा निवडणूक लढलेले, दोनवेळचे आमदार व प्रत्येक निवडणुकीत चढत्या क्रमाने मते प्राप्त केलेले दामू नाईक यांच्या नावाला सर्वाधिक पसंती आहे. त्यानंतर माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्याही नावाची चर्चा आहे. माजी मंत्री दिलीप पऊळेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व दयानंद सोपटे यांचेही प्रयत्न सुरु आहेत. तरीही पक्षाकडून या पदासाठी लोकप्रियता हा निकष लावला जातो की अन्य कोणता? ते दि. 25 पर्यंत स्पष्ट होणार आहे.