For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंजीत पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

10:35 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुंजीत पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया
Advertisement

ग्रा. पं. चे दुर्लक्ष : पाईपलाईनमधून अनेक ठिकाणी पाणी गळती : नागरिकांतून नाराजी

Advertisement

वार्ताहर /गुंजी

गेल्या अनेक दिवसांपासून गुंजीमध्ये पाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी गुंजीमध्ये घरगुती नळ जोडणीसाठी पाईपलाईन घालण्यात आली होती. त्यानंतर गावातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात आले होते. मात्र सध्या सदर पाईपलाईनमधून अनेक ठिकाणी पाणी गळती सुरू असून पंचायतीने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील हरीमंदिरजवळ ग्रामपंचायतीने गळती काढण्यासाठी कंबर कसली होती. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता फोडून भलामोठा ख•ा खणून तेथील गळती बंद करण्यात आली होती. मात्र नंतर इतर ठिकाणची गळती न काढता सदर काम थांबविण्यात आल्याने दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामध्ये प्रामुख्याने पंकज कुट्रे यांच्या घरासमोर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरसमोर, शांताराम घाडी यांच्या घरासमोर, तसेच आंबेवाडी रस्ता रणदेव कॉलनीजवळ अशा विविध ठिकाणी पाणी गळती सुरू असून या गळत्या त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. सदर पाणी गळतीमुळे पाणी तर वाया जात आहेच. शिवाय सतत रस्त्यावर पाणी झिरपत असल्याने रस्ता ओला होऊन शेवाळ धरल्यामुळे वाहने घसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

Advertisement

जलजीवन योजना कुचकामी

गुंजीत जलजीवन योजनेमार्फत पाणीटंचाई दूर करून घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी दररोज पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून जलजीवन योजना राबवण्यात आली. परंतू ग्रामस्थांच्या मते ही योजना कुचकामी ठरली असून या योजनेंतर्गत केवळ जुन्या नळजोडणीला मीटर जोडणीचे काम करून ही योजना झाल्याचे भासविण्यात येत आहे. त्यामुळेच गुंजी ग्रामसभेमध्ये या योजनेबद्दलची माहिती मागूनही ती माहिती सदर ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांनी देण्यासाठी असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. ही योजना प्रभावीपणे राबविली असती तर आज पाणी गळतीचे संकट उभे ठाकले नसते. त्याचबरोबर या योजनेमार्फत जोडलेल्या सर्व तोट्या निकृष्ट दर्जाच्या वापरल्या गेल्यानेच त्या तोट्यातूनही पाणी गळती सुरू असल्याने पाणी गळतीत भर पडत आहे. याविषयी गुंजी पीडीओंना विचारले असता पाईपलाईन गळती बंद करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातील. मात्र नागरिकांनी आपापल्या घराच्या नळांच्या तोट्या व्यवस्थितरीत्या बसवून घेऊन पाणी गळती रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

जलजीवन योजन राबवूनही तीन दिवसाआड पाणी

जलजीवन योजना कार्यान्वित झाल्यानंतर गुंजीमध्ये दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गुंजीतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता योग्य नियोजन केल्यास या ठिकाणी दररोज पाणी मिळणे शक्य आहे. मात्र पंचायतीच्या समन्वयाअभावी गावात नियोजनबद्ध पाईपलाईन घातली गेली नसल्याने नागरिकांना तीन दिवसाआड पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. तरी संबंधितांनी या बाबींकडे लक्ष घालून त्वरित सर्व ठिकाणची पाणी गळती थांबवून गावात दररोज सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.