अंबाबाई दर्शनासाठी हजारो भाविक
कोल्हापूर :
नववर्षातील पहिल्यांदाच सलग दोन दिवसाची सुट्टी असल्याने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर न्यू पॅलेस, रंकाळा पाहून पन्हाळा, दाजिपूर, आंबा आदी परिसरात पर्यटनाचा आनंद घेतला.
शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्याने जोतिबा, अंबाबाईचे दर्शन घेऊन भाविकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. शेकडो भाविकांनी मुखदर्शन घेऊन कुटुंबाला सुखी ठेवण्याचे अंबाबाईला साकडे घातले. भाविक अंबाबाई, जोतिबाचे दर्शन घेत पन्हाळ्यासह इतर ठिकाणी पर्यटनासाठी निघून गेले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोल्हापुरात गर्दी असल्याने ट्रॅफिक जाम झाले होते. बिंदू चौक, दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपसह आदी पार्किंगमध्ये भाविकांच्या वाहनांची गर्दी होती. तर एस. टी. व रेल्वेने आलेल्या भाविकांची संख्याही जास्त असल्याने रिक्षाचालकांच्या व्यवसायात वाढ झाली. अंबाबाई मंदिर परिसरातील ओटी व पूजेचे साहित्य, प्रसादाची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते. त्यामुळे दिवसभर अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती.