गुरुवारी दुर्गामाता दौडला हजारोंची उपस्थिती
दिवसेंदिवस दौडला वाढता प्रतिसाद : शहराच्या मुख्य भागात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा-दुर्गादेवीचा जागर
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने काढण्यात येत असलेल्या दुर्गामाता दौडला प्रतिसाद वाढत आहे. गुरुवारी शहराच्या मुख्य भागांमध्ये दुर्गामाता दौड हजारोंच्या उपस्थितीत काढण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा तसेच दुर्गादेवीचा जागर करत दुर्गामाता दौड काढण्यात आली. युवकांबरोबरच महिलांचीही संख्या मोठी असल्याचे गुरुवारी दिसून आले. चौथ्या दिवशीच्या दौडला शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी चौक येथून सुरुवात झाली. सीपीआय आनंद वणकुंद्रे व सीपीआय श्रीशैल गाभी यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून ध्वज चढविण्यात आला. प्रेरणा मंत्र म्हणून दौडला प्रारंभ झाला. बसवाण गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, भडकल गल्ली, बापट गल्ली या परिसरात दौडचे भव्य स्वागत केले. ठिकठिकाणी शुभेच्छा फलक उभारण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करण्यात आले होते.
संयुक्त महाराष्ट्र चौक येथे दौड पोहोचल्यानंतर प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी उपस्थित धारकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, शिवरायांच्या अपूर्ण इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी तुमची निवड केली आहे. हा सबंध देश छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालत राहावा, यासाठीच ही दुर्गामाता दौड काढली जाते. शिवरायांच्या काळात स्त्राr ही देवघरातील देवता होती, तिच्यावर वाकडी नजर करणाऱ्यांचे महाराज चौरंगा करायचे. पण आज स्वतंत्र हिंदुस्थानात आपल्या माताभगिनींना सुरक्षितता नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण शिवछत्रपतींचा मार्ग विसरत चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले. ध्येयमंत्राने संयुक्त महाराष्ट्र येथील मारुती मंदिरात सांगता झाली. स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे संचालक सचिन सांबरेकर व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. गुरुवारी झालेल्या दौडमध्ये मोठ्या संख्येने महिला, युवती तसेच युवक सहभागी झाले होते. पांढरे सदरे व डोक्यावर भगवे फेटे घातल्याने शहराच्या मुख्य भागात भगवेमय वातावरण दिसून आले.
शनिवारचा दौडीचा मार्ग
शनिवार दि. 27 रोजी श्री हरिद्रा गणेश मंदिरापासून सुरुवात होऊन सदाशिवनगर मेन रोड, गणेश चौक, सदाशिवनगर 2 मेन 4 था क्रॉस, बेलदार छावणी, मरगाई मंदिर, सदाशिवनगर 1 ला मेन 1 ला क्रॉस, 2 रा क्रॉस, 3 रा क्रॉस, चौथा क्रॉस, नेहरूनगर 3 रा क्रॉस, 2 रा क्रॉस, 1 ला क्रॉस, कोल्हापूर सर्कल, जवान क्वॉर्टर्स, सुभाषनगर, मराठा मंडळ रोड, वड्डरवाडी, रामनगर, अशोकनगरमार्गे शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात सांगता होणार आहे.