वाहनांवर ‘प्रेस’ लिहिलेल्यांची होणार चौकशी
वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी : प्रेस हटविण्याची समज
बेळगाव : मोटारसायकलवर ‘प्रेस’ असे लिहून गैरफायदा घेणाऱ्यांचा वाहतूक पोलिसांनी शोध चालविला आहे. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जोतिबा निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला असून प्रसार माध्यमाशी कोणताही संबंध नसताना विनाकारण वाहनांवर ‘प्रेस’ लिहिल्यांची चौकशी केली जात आहे. इतकेच नव्हे तर संबंधितांना वाहनांवरील ‘प्रेस’ हटविण्यास सांगून त्यांना समज दिला जात आहे. गेल्या काही वर्षापासून शहरासह बेळगाव जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून नागरिकांना ब्लॅकमेल करण्यासह सरकारी अधिकाऱ्यांनादेखील धमकावण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यातच कोणत्याही प्रसार माध्यमांशी तिळमात्र संबंध नसलेल्यांनीदेखील आपल्या वाहनांवर प्रेस असे लिहिले आहे.
प्रेस लिहिल्याने सहसा पोलिस संबंधीत वाहनांला थांबवत नाही. एखाद्या प्रसार माध्यमाचा प्रतिनिधी आहे, असे समजून संबंधिताला सूट दिली जाते. मात्र या नावाचा काहीजणांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बाजारपेठेत राजस्थानी व्यापाऱ्यांकडून दुचाकी वाहनांवर प्रेस असे लिहिले असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर प्रेस लिहिलेल्यांना थांबवून त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली जात आहे. इतकेच नव्हेतर ते कोणत्या दैनिकांत किंवा मीडियाशी संबंधित आहेत, त्यांच्या मुख्य प्रतिनिधींशी पोलिस संपर्क साधून खात्री करून घेत आहेत. गेल्या महिन्याभरापासून वाहतूक पोलिसांनी वाहनांवर प्रेस लिहिलेल्यांची चौकशी करत आहेत. विनाकारण प्रेस लिहिलेल्यांना समज देत वाहनांवरील अक्षरे काढण्यास भाग पाडले जात आहे.