‘जमीन’ गमावलेल्यांनी केली पळता ‘भुई’ थोडी!
हिडकल जलाशयात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा : कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांचा पोबारा
बेळगाव : हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. 45 वर्षांचा कालावधी उलटत आला तरी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली नसल्याने हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी गावासह परिसरातील नागरिकांनी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन हाती घेतले आहे. कार्यालयाच्या आवारात जनावरे बांधून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आपली मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कार्यालयाला टाळे लावून पोबारा करण्याची वेळ आली आहे. हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी, गुडगनट्टी, बिरनहोळी आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हिडकल जलाशयासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. जवळपास 2 हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. 45 वर्षांचा कालावधी उलटत आला तरी जमीन गमावलेल्या बिरनोळी, मास्तीहोळी आदी गावातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. संपादित करण्यात आलेल्या 2 हजार एकर जमिनीपैकी 394 एकर 26 गुंठे जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. अनेकवेळा शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा केला असला तरी याची दखल घेण्यात आलेली नाही.
चन्नम्मा चौकात दोन तास वाहतूक ठप्प
सरदार्स मैदानावर जमलेल्या शेतकऱ्यांकडून पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली. याला न जुमानता शेतकऱ्यांनी आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका घेतली. चन्नम्मा चौकात जवळपास दोन तास जनावरे घेऊन आंदोलन केल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम झाला. चन्नम्मा चौकातून होणारी वाहतूक सदाशिवनगर व इतर भागातून वळविण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागली. तर शालेय विद्यार्थ्यांनाही बस पकडण्यासाठी धावाधाव करावी लागली.